कृषी पंढरी शेतकऱ्यांनी गजबजली

कृषी पंढरी शेतकऱ्यांनी गजबजली

वाणगाव, ता. २ (बातमीदार) : शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. व्यावसायिक दृष्टीने शेती केल्यास चांगला फायदा होईल. तसेच, काळानुरूप शेती करताना उत्पादन खर्च कमी होण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्यावर भर दिल्यास किफायतशीर शेती करता येते, असे मत उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे यांनी व्यक्त केले. डहाणूतील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, पंचायत समिती, तालुका कृषी विभाग डहाणू आणि रोटरी क्लब ऑफ डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने कोसबाडच्या कृषी पंढरीत कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
भारत हा कृषिप्रधान देश असून शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्रात होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. सरकारच्या कृषीविषयक विविध योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन बर्वे यांनी केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्याची ओळख करून देत ते कृषी विज्ञान केंद्रास कृषी पंढरी म्हणायचे, अशी आठवण करून दिली. बळीराजाचा आणि आधुनिक शेतीचे ज्ञान देणाऱ्या शास्त्रज्ञांचा सन्मान करणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन या वेळी रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. आदित्य आहिरे यांनी केले. कृषी अधिकारी प्रशांत जाधव यांनी पंचायत समिती राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्रावरील प्रक्षेत्र भेटीमध्ये भातलागवडीच्या विविध पद्धतींची, लावणी यंत्राची आणि ट्रे भात रोपवाटिकेबाबतची माहिती शास्त्रज्ञ भरत कुशारे आणि प्रशांत वरठा यांनी दिली. याप्रसंगी डहाणूचे तालुका कृषी अधिकारी रवींद्र पाचपुते, कृषिभूषण विनायक बारी, शेतीनिष्ठ शेतकरी चंद्रकांत पाटील, मंडळ कृषी अधिकारी जगदीश पाटील आदींनी मार्गदर्शन केले.


बदलत्या हवामानानुसार शेतीपद्धती स्वीकारा
शेतकऱ्यांनी उपलब्ध क्षेत्रांपैकी किमान दहा टक्के क्षेत्रात वाडा कोलमची लागवड आणि त्यानंतर सफेद कांदा लागवड करावी. बदलत्या हवामानानुसार शेतीपद्धत स्वीकारली पाहिजे. सरकारनेही शेतमालाला चांगला भाव द्यावा यासाठी प्रयत्न करावेत, असे कृषिभूषण यज्ञेश सावे यांनी सूचविले.

शेतकरी, शास्त्रज्ञांचा सत्कार
रूपाली बाबरेकर, चंद्रकांत पाटील, यज्ञेश सावे, विनायक बारी, कुणाल माळी, नीलेश पाटील, जयदेव गोवारी यांना, वसंतराव नाईक कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचा; तसेच बिरसा मुंडा योजनेंतर्गत विहीर घेणाऱ्या लाभार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


वसई पंचायत समितीतर्फे प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान
विरार, ता. २ (बातमीदार) : महाराष्ट्रात १९७२च्या दुष्काळात रोजगार हमी योजना देणाऱ्या; तसेच शेतकऱ्यांसाठी भरीव काम करणाऱ्या वसंतराव नाईक यांना अभिवादन म्हणून कृषी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त तालुक्यातील प्रगतशील, प्रयोगशील आणि शेतीत सातत्य राखणाऱ्या शेतकऱ्यांचा वसई पंचायत समितीतर्फे सन्मान करण्यात आला.
१०० टक्के अनुदानित फळ शेती आणि एमएजेएस योजनेंतर्गत बांबू लागवड, जो मागेल त्याला शेततळे यासाठी ५० टक्के अनुदान, मजूर टंचाईवर उपाय म्हणजे यांत्रिकीकरण, महा डीबीटी पोर्टल काय आहे, त्याचा शेतकऱ्यांनी कसा वापर करावा, मोठा ट्रॅक्टर एक लाख २५ हजार, पावर ट्रेलरला ८० हजार अनुदान; पण हे सर्व ऑनलाईन करावे लागेल, अशी माहिती वसई पंचायत समितीतर्फे देण्यात आली. पोषकतत्वयुक्त ड्रॅगन फ्रुट लागवड ही आता फायदेशीर ठरत आहे. जास्त प्रमाणात आपल्याकडे भात लागवड जास्त क्षेत्र असून सरकारकडून केवळ एक रुपयात पीकविमा, पीएम किसान योजना या शेतकऱ्यांना आधार ठरणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीऐवजी एसआरटी, ड्रम सीडर, यांत्रिक शेती करून मजूर टंचाईवर मात करावी. तसेच गोपीनाथ मुंडे अपघात योजना आहे, त्याचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. आदिवासी शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, यात विहीर पंप मिळेल; पण त्यासाठी किमान ४० गुंठे क्षेत्र असणे आवश्यक आहे. तसेच ५० टक्के अनुदानात स्प्रे पंप, डिझेल इंजिन हे पंचायत समितीमार्फत उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाला सभापती अशोक पाटील, उपसभापती सुनील अंकारे, गटविकास अधिकारी संगीता भांगरे-डहाळे, कृषी अधिकारी आदित्य राऊळ, सहायक कृषी अधिकारी पी. के. पाटील, सविता घायवट, विस्तार अधिकारी घनश्याम पाटील, मंडळ कृषी अधिकारी नामदेव शिंदे, कृषी सहायक व कृषी पर्यवेक्षक यांच्यासह तालुक्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.


कृषी तंत्र विद्यालयात वृक्षारोपण
वाणगाव, ता. २ ( बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील कृषी तंत्र विद्यालय, आसनगाव येथे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन करून वृक्षारोपणातून कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी तंत्र विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर कृषीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फळझाडांच्या कलमांची वृषाली पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. कृषीच्या विद्यार्थ्यांनी सरकारच्या शेतीपूरक योजनांचे आकलन करून त्यांचा प्रसार इतर शेतकऱ्यापर्यंत करावा. नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनावे आणि परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करावे, असा सल्ला कार्यकारी संचालक तृप्ती पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. संस्थेचे समन्वय अधिकारी केशव मोहिते, कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्य सोनालिका पाटील, प्रा. मंदा कोंढारी, प्रा. प्रवीण भोये, प्रा. श्रद्धा कोरे, प्रा.दिलीप पवार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com