रायगडच्या आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनचा प्रभावी वापर

रायगडच्या आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनचा प्रभावी वापर

Published on

आपत्ती व्यवस्थापनात ‘ड्रोन’ प्रभावी
रायगड पोलिसांकडे सक्षम यंत्रणा; वाहतूक कोंडी, शिवराज्यभिषेक दिनसोहळ्यासह बचाव मोहिमांवर नजर

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : रायगड हा सर्वाधिक आपत्तीप्रवण जिल्हा आहे. आपत्ती व्यवस्थापनात वेगवेगळे पर्याय निवडताना रायगड पोलिस दलाकडून ड्रोनचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी, शिवराज्यभिषेक दिनसोहळ्यानिमित्ताने किल्ले रायगडवर होणारी शिवप्रेमींची गर्दी याबरोबर दऱ्या खोऱ्यात अडकणाऱ्यांपर्यंत पोहचण्यात ड्रोनचा प्रभावीपणे वापर करण्यात रायगड पोलिसांना यश येत आहे.
रायगड पोलिस दलात सद्यःस्थितीत दोन चांगल्या क्षमतेचे ड्रोन आहेत. ही क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून आणखी एक ड्रोन घेतला जाणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनकडून १५ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात दरडी कोसळणे, धबधब्यामध्ये पर्यटकांचा बुडून मृत्‍यू, नदीमध्ये वाहून जाणे याचबरोबर पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची स्थिती जाणून घेण्यासाठी रायगड पोलिस दलाकडून ड्रोनचा अधिक सक्षमपणे केला जात असल्याचे दिसून येत आहे. ज्या ठिकाणी बचाव पथकाला पोहचता येत नाही, त्या कड्याकपारीच्या जवळ जाऊन ड्रोन कॅमेऱ्याने पाहणी करून वस्तुस्थितीचा आढावा काही मिनिटांमध्येच घेता येतो. यात जोखीम कमी असल्याने रायगड पोलिसांकडून अशा प्रकारच्या ड्रोनचा वापर केला जात आहे.

देवकुंड धबधब्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा यशस्वी शोध
२७ जून रोजी देवकुंड धबधब्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध लागत नव्हता. देवकुंड धबधब्यात उतरणे अधिक धोकादायक असल्याने बचाव पथकाकडूनही जोखीम पत्करली जात नव्हती, अखेर शोध मोहिमेसाठी ड्रोनचा वापर केला. या ड्रोन कॅमेऱ्याने धबधब्याच्या खालील भागात अडकलेल्या मृतदेहाचे ठिकाण, त्याची स्थिती आणि तिथपर्यंत जाण्याचा मार्ग बचावपथकांच्या सदस्यांना काढता आला. माथेरानमध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या शोधमोहिमांमध्येही यापूर्वी ड्रोनचा वापर झाला आहे.

-----
महामार्गावरील कोंडी सोडवण्यात यश
गणेशोत्‍सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलिस तैनात असतीलच असे नाही. रस्त्याच्या बाजूला चिखल आणि रस्त्यातील खड्ड्यांमध्ये अडकलेल्या वाहनांमुळे मार्ग काढण्यात पोलिसांना अडचणी येतात. मात्र, त्याच वेळेस ड्रोनच्या साह्याने काही मिनिटांतच वाहतूक कोंडी झालेल्या ठिकाणचे छायाचित्र नियंत्रण कक्षात पाठवता येतात. आणि कोंडी फोडण्यासाठी नियंत्रण कक्षातून ध्वनीक्षेपाच्या माध्यमातून योग्य सूचना दिल्या जातात, हा प्रयोग गतवर्षी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी यशस्वी केला होता.

किल्ले रायगडवरील गर्दीवर ड्रोनद्वारे निगराणी
किल्ले रायगडची पायवाट अवघड असून शिवप्रेमींच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिस ड्रोनचा चांगल्या प्रकारे वापर करीत आहेत. याचे कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केलेले आहे. शिवराज्याभिषेक दिनसोहळ्याच्या दिवशी रायगडवर मोठ्या संख्येने शिवप्रेमी येतात. या गर्दीवर नजर ठेवण्यासाठी मनुष्यबळ कुचकामी ठरते, परंतु ड्रोनद्वारे सर्व बाजूने लक्ष ठेवता येते. धोक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना योग्य सल्ला दिला जातो. गतवर्षी ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनी झालेली कोंडी फोडण्यात रायगड पोलिसांना काही क्षणातच यश आले होते.

ड्रोन हा बचावपथकातील अविभाज्य भाग होत आहे. येथील दुर्गम भागात तर ते गरजेचे आहे. डोंगर,कड्याकपारीत शोधकार्य राबवण्यातही ड्रोनचा वापर होत आहे. त्याचबरोबर दुर्गम भागात घडलेल्या दुर्घटनेची वस्तुस्थिती समजावी यासाठी ड्रोनची क्षमता वाढवली जात आहे.
- अतुल झेंडे, अपर पोलिस अधीक्षक, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.