कुर्ल्यात महापालिकेचा हातोडा

कुर्ल्यात महापालिकेचा हातोडा

सकाळ इम्‍पॅक्‍ट
कुर्ल्यात महापालिकेचा हातोडा
दुकानदारांसह बाकडेवाल्यांची पळापळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : कुर्ला पश्चिमेला रेल्वे स्थानक ते भारत सिनेमादरम्यान प्रशस्त रस्ता आहे; मात्र फूटपाथचा ताबा दुकानदारांनी घेतला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूवर बाकडेवाल्यांनी कब्जा केला असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने नुकतेच प्रकाशित केले होते. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारी (ता. १) सकाळपासूनच फूटपाथवरील बांधकाम हटविण्याची मोहीम राबवली. दुकानांसमोर असलेले कठडे, पायऱ्या, आडव्या भिंती तोडल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंबईत फूटपाथ असूनही ते नागरिकांना चालण्यासाठी उपलब्ध का होत नाहीत, असा खडा सवाल करत उच्च न्यायालयाने नुकतेच महापालिकेचे कान टोचले होते. त्याची दखल घेत ‘सकाळ’ने मुंबईतील फूटपाथवर कसे अतिक्रमण झाले आहे, याचा आढावा घेतला होता. त्यामुळे फूटपाथवरील बांधकामे, फेरीवाले, बाकडेवाले पालिकेच्या रडारवर आले आहेत. सकाळी कुर्ला पश्चिमेला रेल्वे स्थानक ते भारत सिनेमादरम्याच्या मार्गावरील फूटपाथवर असलेली बांधकामे तोडली. त्यामुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पालिकेचे कर्मचारी अतिक्रमण हटवण्यासाठी फिल्डवर उतरल्याने कुर्ला स्थानक परिसरातील रस्ता फेरीवालामुक्त झाला होता.

रेल्वे स्थानक परिसरातील दुकानदारांनी फूटपाथवर केलेल्या बांधकामावर केलेल्या कारवाईमुळे फूटपाथ मोकळे झाले आहेत; मात्र ही कारवाई औट घटकेची ठरू नये.
- कामिनी चव्हाण, नोकरदार

सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कुर्ला स्थानकात फेरीवाले आणि बाखडेवाल्यांचे साम्राज्य असते; पण आज पालिकेने केलेल्या कारवाईमुळे रस्ता रिकामा झाला असून वाहतूकही अडथळ्यांशिवाय सुरू आहे. पालिकेने सातत्याने अशी कारवाई करायला हवी.
- कुमार यादव, नोकरदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com