खरीप हंगामातील पेरण्यांची कामे पूर्ण

खरीप हंगामातील पेरण्यांची कामे पूर्ण

मनोर, ता. ३ : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस बरसत असल्याने भातशेतीच्या पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. खरीप हंगामातील एकूण लागवड क्षेत्र असलेल्या एक लाख चार हजार ९६२ हेक्टरपैकी ७६ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रात भातलागवड केली जाते. भातलागवडीच्या सात हजार ६६४ क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे. सिंचनाची सोय उपलब्ध असलेल्या भागात धूळवाफ आणि राबाची पेरणी केलेले शेतकरी लवकरच भातलावणीच्या कामांना सुरुवात करणार आहेत.

पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. एक लाख चार हजार ९६२ हेक्टर क्षेत्रात भात, नागली, वरई, तूर, उडीद भुईमूग आदी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यातील प्रमुख पीक भात आहे. त्यामुळे सर्वाधिक सात हजार ६६४ हेक्टर क्षेत्रात भातलागवड केली जाते; तर जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातील डोंगरउतारावर नागली आणि वरईची पेरणी करण्यात येते. नाचणी लागवडीचे क्षेत्र एक हजार १३ हेक्टर असून पेरणी एक हजार ४२ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे.

जिल्ह्यात प्रमुख पिकांच्या पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. पहिल्या पावसात पेरणी केलेले भात आणि नाचणीची रोपे लागवडीयोग्य झाल्याने लवकरच लागवडीच्या कामांना शेतकऱ्यांकडून सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी भागेश्वर यांनी दिली.

उत्पादन घटण्याची भीती
खरीप हंगामात शेताचे बांध आणि डोंगरउतारावर तुरीची लागवड केली जाते. तुरीची पेरणी दोन हजार ६२० हेक्टर क्षेत्रात केली जाते. पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर एक हजार ३०९ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी करण्यात आली आहे. डोंगरउताराच्या जमिनीवरील उडदाची लागवड तीन हजार २५२ हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. उडदाची पेरणी ७५२ हेक्टर क्षेत्रात केली आहे. इतर कडधान्यांची लागवड आठ हजार ८६ हेक्टर क्षेत्रात केली जाते. यंदाच्या खरीप हंगामात ८०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीचे क्षेत्र घटल्याने कडधान्यांचे उत्पादन घटण्याची भीती आहे.

यांत्रिक पद्धतीने लागवड
वाडा आणि डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांकडून यांत्रिक पद्धतीने भात लागवड केली जात आहे. यांत्रिक पद्धतीने लागवड करण्यासाठी नर्सरीमध्ये पॅड पद्धतीने रोपे तयार करून मशीनद्वारे लागवड केली जाते. मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने यांत्रिक पद्धतीच्या भातलागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने अनुदान दिले जात आहे. गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा यांत्रिक लागवडीकडे कल असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यात झालेल्या पेरण्या (कृषी विभागाची आकडेवारी)
पीक एकूण क्षेत्र पेरणी टक्केवारी
भात ७६६४४ ६०८० ७९.०३
नागली १२१३२ ११४२ ९४.१५
वरई ८०८६ ७३१ ९०.५०
तूर २६२० १३०९ ९.९७
उडीद ३२५२ ७५१ २३.०९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com