भायखळ्यात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

भायखळ्यात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

भायखळ्यात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
मुंबई, ता. ३ ः शिवशाहू प्रतिष्ठान, लोअर परळ वृत्तपत्र विक्रेता संघ, उद्दिष्‍ट प्रतिष्ठानने आयोजित केलेल्‍या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व करिअर मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा मुंबई येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पत्रकार, दिग्दर्शक व निर्माता नितीन वैद्य यांनी मागर्दर्शनादरम्‍यान स्वतःच्या आयुष्यातील अनुभव सांगितले. ते म्‍हणाले, आयुष्यात कधीही संधी चुकवू नका. आयुष्यातील प्रत्येक क्षणाला एक संधीप्रमाणे बघा. आयुष्य हे कधीच स्थिर नसावे. स्थिर आयुष्य नेहमी आपली प्रगती थांबवते. नवीन आव्हानांना सामोरे जात नवीन गोष्टी शिकल्‍या पाहिजेत. उद्योजकतेकडे जास्त लक्ष द्या, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना, असा संदेश त्यांनी दिला. वक्ते पवन अग्रवाल यांनी जिद्द, चिकाटी, मेहनत, संस्कार या विषयांवर भाष्य केले. मुला-मुलींच्या वाढत्या वयात एकमेकांबद्दल होणारे आकर्षण याकडे दुर्लक्ष करून करिअरवर लक्ष देणे जास्त महत्त्वाचे आहे, हा मुद्दा सुंदररित्या त्‍यांनी समजावला.
समुपदेशक आरती बनसोडे म्‍हणाल्‍या, करिअर आपल्याला आवडेल त्याच क्षेत्रात करा, जेणेकरून काम करताना पश्‍चाताप होण्याऐवजी तुम्हाला आनंद मिळेल. देशाला आणि आपल्या पालकांना अभिमान वाटेल असेच कार्य करा. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून तोच वेळ वृत्तपत्र वाचनासाठी सत्कारणी लावावा, हे सुचविले. यावेळी जीवन भोसले यांच्या संकल्पनेतून, प्रिया पाटील व अमर गावडे यांच्या सहकार्याने करिअर मार्गदर्शन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. आमदार आदित्य ठाकरे यांनी अनपेक्षितपणे कार्यक्रमाला भेट दिली. त्‍यामुळे विद्यार्थी व पालकांचा आनंद द्विगुणीत झाला. आदित्य ठाकरेेंसोबत फोटो घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खोत यांनी केले. ४०० पेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला. डॉ. निलेश मानकर (समाजसेवक), विलास पाटील (सहकार क्षेत्र), कृष्णकांत शिंदे (ग्राहक सेवा), सुनील शिंदे (शैक्षणिक), संजय चौकेकर, रत्नाकर चंदन, संतोष वर्टेकर, सतिश पाटील, मितेश बगाडिया व प्रिया पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
प्रमुख वितरक बाजिराव शेठ दांगट यांच्यासह बृहन्मुंबई वृत्तपत्र संघाचे  विजय रावराणे, मधुसूदन सदडेकर, रवि चिले, भालचंद्र पाटे, राजू धावरे, अजय उतेकर, प्रकाश गिलबिले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार विश्वस्त जीवन भोसले, अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com