‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’चा मार्ग मोकळा

‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’चा मार्ग मोकळा

Published on

‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’चा मार्ग मोकळा
१२० एकर भूखंड पालिकेच्या ताब्यात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाडेपट्टा करार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महालक्ष्मी येथील रेसकोर्सवरील सुमारे १२० एकर जमीन आणि त्यासोबत कोस्टल रोड प्रकल्पातील सुमारे १७५ एकर क्षेत्र असे संपूर्ण मिळून जवळपास ३०० एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स भूखंडावरील एकूण २११ एकरपैकी सुमारे ९१ एकर भूखंड ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना देण्याच्या करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत मंगळवारी (ता. २) स्वाक्षरी करण्यात आल्या. त्यामुळे आता त्यातील १२० एकर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स येथील २११ एकर क्षेत्राचा भूखंड हा गेल्या १०० वर्षांपासून अधिक काळ मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना मक्ता कराराने देण्यात आला होता. या जागेचा भाडेपट्टा करार काही वर्षांपूर्वी संपल्यानंतर हा भूखंड व्यापक नागरी हिताच्या दृष्टीने पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. यासाठी विविध कायदेशीर बाबी, वैधानिक आव्हाने आणि प्रशासकीय अडचणी यातून सर्वमान्य होईल, असा मार्ग काढणे ही सर्वात आव्हानात्मक बाब होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी तसेच उपआयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड व मालमत्ता विभागाने या विषयाचा सखोल अभ्यास आणि पाठपुरावा करून सर्वमान्य तोडगा काढण्यात यश मिळविले आहे.

..
३० वर्षांसाठी करार
महालक्ष्मी रेसकोर्स भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर एकूण भूखंडापैकी १२० एकर भूखंड शासनाच्या माध्यमातून पालिकेच्या ताब्यात देण्यास महाराष्ट्र शासनाने अलीकडे मान्यता दिली, तर उर्वरित ९१ एकर भूखंड मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. हा भाडेपट्टा करार दिनांक १ जून २०२३ पासून ते दिनांक ३१ मे २०५३ या ३० वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
..
थीम पार्कच्या कामाला येणार वेग
१२० एकर जागा आता पालिकेच्या ताब्यात आली आहे. ही १२० एकर जागा, तसेच रेसकोर्स परिसरामध्ये लागून असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील १७५ एकर जागा, असे दोन्ही मिळून जवळपास ३०० एकर जागेवर न्यूयॉर्क, लंडन या शहरांच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून आता वेग दिला जाईल.
..
व्यावसायिक बांधकाम नाही
मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांच्याकडून परत घेण्यात आलेल्या जागेवर कोणत्याही स्वरुपाचे व्यावसायिक, व्यापारी बांधकाम करण्यात येऊ नये. या जागेचा वापर सार्वजनिक वापराकरिता, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्याकरिता करण्यात यावा, असे निर्देश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दिले आहेत.

..
हरित क्षेत्र हे पर्यावरण संवर्धनच
मुंबई किनारी रस्ता व महालक्ष्मी रेसकोर्स मिळून जवळपास ३०० एकरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित झाल्यामुळे मुंबईची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक ठळक होईल. मुंबईचे सध्या अस्तित्वात असणारे तीन हजार ९१७ एकर हरित क्षेत्र वाढून आता चार हजार २१२ एकर इतके होईल. तब्बल ३०० एकरवरील हरित क्षेत्र हे मुंबईच्या पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.