डेंगी, हिवतापाची मोफत चाचणी

डेंगी, हिवतापाची मोफत चाचणी

डेंगी, हिवतापाची मोफत चाचणी
फीव्हर ओपीडी, वॉर रूम सुविधा; पालिका आयुक्तांनी घेतली बैठक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी पालिका सज्ज झाली असून रूग्णांचा त्वरित शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करत तत्काळ उपचार करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. यंदा मुंबईत पावसाळी आजारांसाठी राखीव अशा तीन हजार बेड उपलब्ध आहेत. तसेच तापसदृश आजारांसाठी ‘फिव्हर ओपीडी’ ची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांनी पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी एकत्रित पद्धतीने प्रयत्न करावेत, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आढावा बैठकीत दिले.
विविध शासकीय, निम-शासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयात बुधवारी (ता.३) पार पडली. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, संचालक डॉ.नीलम अंद्राडे, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ, प्रमुख रूग्णालयाचे अधिष्ठाता यांच्यासह मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय संस्था आणि प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आणखी एका बैठकीमध्ये विभागातील सहाय्यक आयुक्तांनाही पावसाळाजन्य आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल, वायूदल, अभियांत्रिकी सेवा, बेस्ट, डाक विभाग, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., भाभा अणुसंशोधन केंद्र, दुग्ध विभाग अशा शासकीय, निम-शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. समाजासाठी अतिशय घातक अशा डेंगी, मलेरिया यासारख्या आजारांवर प्रतिबंधासाठी विविध यंत्रणांच्या सहाय्याने सामूहिक पद्धतीने योगदान गरजेचे आहे. पावसाळ्यातील आगामी तीन महिने हे आव्हानात्मक असणार आहेत. डासांची उत्पत्ती स्थाने शोधून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या पद्धतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न गरजेचे आहेत. अविरतपणे एकत्र सहभागातून पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान देण्याचे आवाहन गगराणी यांनी केले आहे.

प्रमुख रूग्णालयांमध्ये तीन हजार बेड
पालिकेच्या प्रमुख चार रूग्णालयांमध्ये पावसाळी आजारांच्या उपचारासाठी एकूण ३ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये केईएममध्ये ३० बेड, सायन रुग्णालयात १६२ बेड, नायर रूग्णालय ४११ बेड, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे डॉ. रू.न. कूपर रूग्णालय १०७ बेड, तसेच उपनगरीय सर्वसाधारण रूग्णालयात ९६१ बेड अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

२४ तास बाह्यरूग्णसेवा
तापसदृश्य उपचारांसाठी पालिकेच्या प्रमुख रूग्णालयांमध्ये २४ तास बाह्यरूग्णसेवा उपलब्ध आहे. केईएम रूग्णालय दुपारी ४ ते रात्री १०, कूपर दुपारी २ ते रात्री ८, सायन रूग्णालय २४ तास, नायर रूग्णालय दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत तर, उपनगरीय रूग्णालयात सायंकाळच्या वेळेत बाह्य रूग्ण सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com