लाडकी बहिणीला अंगणवाडी सेविकांचा आधार

लाडकी बहिणीला अंगणवाडी सेविकांचा आधार

वसई, ता. ४ (बातमीदार) : माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांमध्ये पोहोचवण्यासाठी, तसेच प्रभावीपणे जागरूकता करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. उत्पन्नाचा दाखला व डोमिसाईलशिवाय आता केवळ रेशन कार्डची आवश्यकता असल्याने ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रिया राबवली जाणार आहे, तसेच लाडक्या बहिणींना अंगणवाडी, मदतनीस आणि बचत गटाचा आधार मिळणार आहे.

पालघर जिल्हा आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या ठिकाणी दुर्गम, अतिदुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रोजगाराचे साधन फार कमी प्रमाणात आहे. त्यातच लाडकी बहीण योजना राज्य सरकारने अंमलात आणल्याने पालघर जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकाला याचा फायदा होणार आहे. अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजना पोहोचावी, त्याचा लाभ प्रत्येक महिलेला मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी मिशन राबवले आहे.

प्रत्येक तालुक्यात जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार असली तरी अनेकांना याबाबत माहिती समजत नाही. त्यामुळे ऑफलाईन अर्जदेखील येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना योजनेची माहिती मिळावी, यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रक्रिया राबवली जाणार आहे. या योजनेत पालघरमधील गरजू महिलांना लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी गोविंदराव बोडके यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजनदेखील करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, प्रांत अधिकारी आगे पाटील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार, तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी सहभाग घेतला होता.

दवंडीच्या माध्यमातून योजनेचा प्रसार
ऑफलाईन प्रक्रिया राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, महिला बचत गटांची मदत घेतली जाणार आहे, तसेच जास्तीत जास्त महिलांपर्यंत योजना पोहोचावी यासाठी गाव व खेडेपाड्यात जनजागृती करण्यात येणार आहे. गावागावांमध्ये दवंडीच्या माध्यमातून योजनेचा प्रसार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे योजनेचे फलक, बॅनर किंवा होर्डिंग प्रत्येक गावातील दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गतिमान पद्धतीने व पारदर्शकपणे जिल्ह्यात राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र असतील त्यांना लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नियोजन केले जात आहे. जनजागृती मोहीम राबवली जात आहे. शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा पालघर जिल्ह्यातील महिलांनी लाभ घ्यावा.
-सुभाष भागडे, निवासी उपजिल्हाधिकारी
-----------------
तहसील कार्यालयाजवळ दर्शनी भागात लाडकी बहीण योजना माहिती फलक लावण्यात येणार आहे, तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्यास अडचण असेल, अशा महिलांसाठी सेतू विभागात प्रशिक्षित कमर्चाऱ्यांकडून अर्ज दाखल करण्यासाठी संगणक व्यवस्था केली जाईल.
- अविनाश कोष्टी, तहसीलदार, वसई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com