विस्तारित ठाणे स्थानकाचा तिढा सुटला

विस्तारित ठाणे स्थानकाचा तिढा सुटला

सकाळ इम्पॅक्ट
---
विस्तारित ठाणे स्थानकाचा तिढा सुटला
रेल्वे मंत्रालयाने वाणिज्य क्षेत्राचा हट्ट सोडला; ठाणे महापालिकेचे १८५ कोटीही वाचणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : ठाणे रेल्वेस्थानकाचा भार हलका करणाऱ्या नव्या विस्तारित रेल्वेस्थानकाचा वाणिज्य क्षेत्राच्या विकासावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. रेल्वे मंत्रालयाने आपला हट्ट सोडत स्थानक परिसरात होणाऱ्या पार्कींग, रॅम्पसह इतर सुविधा उभारण्यास ठाणे पालिकेच्या स्मार्टसिटीला हिरवा कंदील दाखविला. इतकेच नव्हे, तर स्थानकासाठी येणारा खर्चही केंद्राने आपल्या खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या सुमारे १८५ कोटी रुपयांची बचत होणार असून आता नवे विस्तारित रेल्वेस्थानक प्रत्यक्षात रुळावर येणार आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन, महाराष्ट्र शासन आणि ठाणे महापालिका यांच्या वतीने ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे आणि मुलुंडदरम्यान नवे विस्तारित रेल्वेस्थानक बांधण्यात येत आहे. मात्र, तब्बल १५ वर्षांच्या रखडपट्टीनंतर सुरू झालेले हे काम ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. स्थानकाच्या आतील कामे रेल्वेने आणि बाहेरील विकासकामे पालिकेने करणे अपेक्षित होते; पण रेल्वे विभागाने वाणिज्य क्षेत्राचा विकास करून त्याचा ताबा स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला व त्याबाबतचे पत्र महापालिकेला धाडले. त्यामुळे एक वर्षापासून या मुद्दावरच करार खोळंबला. उत्पन्नाचे स्रोत असलेले वाणिज्य क्षेत्र ठाणे महापालिका रेल्वेला सोडण्यासाठी तयार नव्हती, तसा पत्रव्यवहारही करण्यात आला; पण तिढा सुटत नसल्याने विस्तारित स्थानकाच्या कामाला ब्रेक लागला होता.
यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’ने ८ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध केले होते. रेल्वे प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे विस्तारित स्थानक कसे रखडले, याचे सविस्तर वृत्त दिल्यानंतर त्याची दखल नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली. त्यांच्यासोबत पालिका आयुक्त सौरभ राव, स्मार्टसिटीचे सीईओ संदीप माळवी यांनी दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली. त्यात आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकल्पामुळे ठाणे शहराला कसा फायदा होईल, याची माहिती दिली. त्यानंतर खासदार शिंदे व खासदार म्हस्के यांनी परिचलन क्षेत्रातील सर्व कामे रेल्वे मंत्रालयाने करण्याची विनंती केली. ही विनंती त्वरित मान्य करून या कामासाठी भविष्यात होणारी भाववाढ आणि त्या कामासाठी लागणारा अतिरिक्त निधीही रेल्वे मंत्रालयाकडून करण्याची ग्वाही रेल्वेमंत्र्यांनी दिली. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या १८५ कोटी रुपयांच्या निधीची बचत होणार आहे.
---
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- बैठकीतील चर्चेत रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम करणे आदी आनुषंगिक कामे रेल्वेकडून करण्याचे ठरले.
- परिचलन क्षेत्राच्या बाहेरील म्हणजे स्थानक परिसरातील डेक, रॅम्प, डीपी रस्ते, पार्कींग प्लाझा आदी आनुषंगिक कामे स्मार्ट सिटीनेच करण्यावर एकमत झाले.
- परिचलन क्षेत्राच्या बाहेर ठाणे स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी मेट्रो प्रकल्पाचे काम सोडून उर्वरित कामासाठी रेल्वेच्या ना हरकत घेण्याची तरतूदही रद्द करण्यात यावी, या खासदारद्वयींची मागणीही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी मान्य केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com