नारी सक्षमीकरणासाठी मोबाईल व्हॅन

नारी सक्षमीकरणासाठी मोबाईल व्हॅन

Published on

प्रसाद जोशी, वसई
रोजगाराचे साधन आणि स्थानिक उत्पादनाची विक्री करता यावी, तसेच महिलांचे सक्षमीकरण व्हावे, म्हणून वसई-विरार शहरात मोबाईल व्हॅन उपक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या स्थानिक महिलांना हातभार लागणार आहे. तसेच उत्पादन विक्रीला चालना मिळणार आहे, यासाठी असलेले हे मिशन यशस्वी झाल्यास रोजगाराचे साधन अर्थकारणाला गती देणारे ठरेल.

एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असताना हाताला रोजगार नसल्याने संसाराचा गाढा कसा हाकायचा, हा प्रश्न निर्माण होत आहे. अशा वेळी मोबाईल व्हॅनचा आधार हा फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महिलांना आधार मिळणार आहे, यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत टीम फाऊंडेशन यांच्यासमवेत बचतगटाच्या उत्पादनांना व्यवसाय मिळावा, या हेतूने करार करण्यात आला आहे. त्यानुसार उत्पादन नोंदणीसाठी कार्यशाळा, तसेच उत्पादनाची निवड करून नोंदणी करण्यात आली आहे.
स्थानिक बाजारपेठ मिळावी, यासाठी नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था मोबाईल व्हॅन संकल्पना आणण्यात आली आहे. यासाठी उत्पादने विक्री करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. स्थानिक उत्पादन विकारासाठी टीम फाऊंडेशन हे मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देणार आहे, यासाठी सूचनांची अंमलबजावणी वसई-विरार महापालिकेकडून करण्यात येत आहे.

नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या सहायक आयुक्त सानका गोरे यांनी महापालिकेला तसे पत्रदेखील दिले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे वसई-विरार शहरात लवकरच उत्पादन विक्रीसाठी मोबाईल व्हॅन सुरू होणार आहे. त्यामुळे महिलांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार आहे.

संघटनेकडून आर्थिक साह्य
मोबाईल व्हॅन उभी करण्यासाठी शहर व्यवस्थापन कक्ष उभारले जाणार आहे. नागरिक ज्या ठिकाणी वस्तू खरेदी करू शकतात, तिथे जागा मिळणार आहे. मोबाईल व्हॅनचा खर्च हा महिला बचत गटाला येणार नाही, तर टीम फाऊंडेशनच्या आर्थिक साह्यातून होणार आहे. व्हॅनचे व्यवस्थापन हे शहर अभियांतर्गत केले जाणार आहे.

वसई-विरार महापालिकेच्या क्षेत्रातील स्थानिक महिलांना आर्थिक बळ मिळावे, यासाठी मोबाईल व्हॅन फायदेशीर ठरणार आहे. त्यांना उत्पादनाची विक्री करण्यासाठी साधन मिळणार आहे. त्यातून महिलांचे सक्षमीकरण होईल.
- संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

मोबाईल व्हॅन ही संकल्पना वसई-विरार महापालिका लवकरच राबवणार आहे. त्यासाठी कार्यवाही सुरू आहे. जागा निश्चित करून महिला बचतगटाला वस्तू विक्रीसाठी मोबाईल व्हॅन दिली जाईल.
- रुपाली कदम, शहर व्यवस्थापिका, दीनदयाल अंत्योदय योजना

उपक्रमाची रूपरेखा :
- १५० चौमी मोबाईल व्हॅनला जागा.
- स्थानिक उत्पादनाच्या विक्रीला वाव.
- मोबाईल व्हॅनवर फलकांवर स्थानिक संस्था, टीम फाऊंडेशन, बचत गट लोगो
- उत्पादनाची निवड, परवाने आवश्यक
- कक्ष प्रतिनिधी समन्वय
- स्वयंसहायता बचत गटाला जागा उपलब्ध करणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.