भिवंडीतील कोंडीची समस्या सोडविण्यासाठी खासदार रस्त्यावर

भिवंडीतील कोंडीची समस्या सोडविण्यासाठी खासदार रस्त्यावर

Published on

वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : भिवंडी शहरासह ग्रामीण भागात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मुंबई-नाशिक महामार्गाची पाहणी केली. खारेगाव, हायवे दिवा, मानकोली ओवळी, रांजनोली नाका ते वडपापर्यंतच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. या महामार्गावर सुरू असलेल्या व अपूर्ण कामांची पाहणी करून विविध उपाय खासदार म्हात्रे यांनी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सुचविले आहेत. भिवंडीतील वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी वेगवेगळ्या सूचना दिल्या आहेत.

भिवंडीत मागील आठ दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत असून या वाहतूक कोंडीत प्रवाशांना तीन ते चार तास अडकून पडावे लागत आहे. चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांनादेखील या कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या या समस्येची दखल खासदार सुरेश म्हात्रे यांनी घेत गुरुवारी (ता. ४) मुंबई-नाशिक महामार्गासह भिवंडी-ठाणे महामार्ग व मानकोली- अंजूर फाटा- चिंचोटी महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मानकोली येथील आर. के. बिल्डर्स कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत उपाययोजना सूचविण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यात वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनीत राठोड, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे, रस्ता रुंदीकरण कामाचे ठेकेदार यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रस्ता रुंदीकरण करणाऱ्या कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची कामे अपूर्ण आहेत. ज्याचा त्रास सामान्य नागरिक व प्रवाशांना होत असून यापुढे अशा बेजबाबदार कंत्राटदार व अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. भिवंडीतील कोंडी सोडविण्यासाठी लवकरच ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
- सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा, खासदार

खासदार म्हात्रे यांनी सुचविलेल्या सूचनांची वाहतूक विभागाने नोंद घेतली आहे. भिवंडीतील कोंडी सोडविण्यासाठी तत्काळ प्रयत्न करण्यात येणार आहेत. रस्त्यावर होणारी कोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीवरदेखील वेळेनुसार नियंत्रण व नियोजन करण्यात येईल.
- डॉ. विनीत राठोड,
पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.