सरकारी भूलतज्ज्ञाकडून खासगी व्यवसाय

सरकारी भूलतज्ज्ञाकडून खासगी व्यवसाय

Published on

भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या सरकारी रुग्णालयातील कार्यरत भूलतज्ज्ञ खासगी रुग्णालयातही व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले आहे. या भूलतज्ज्ञाला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर दुसरीकडे हा मुद्दा हा विधिमंडळाच्या अधिवेशनातही उपस्थित झाला आहे.

कोणत्याही सरकारी अथवा निमसरकारी सेवेतील डॉक्टर खासगी स्वरुपात व्यवसाय करत नसतील तर त्यांना व्यवसायरोध भत्ता दिला जातो. त्यामुळे हा भत्ता घेणाऱ्या डॉक्टरांना खासगी व्यवसाय करता येत नाही. असे असतानाही भाईंदर पश्चिम येथील जोशी सरकारी रुग्णालयातील भूलतज्ज्ञाने व्यवसायरोध भता घेत असतानाही एका खासगी रुग्णालयात सेवा दिल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जाफर तडवी यांनी त्याला नोटीस बजावली असून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

मिरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात एका गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जोशी सरकारी रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य ओमप्रकाश गाडोदिया यांना मिळाली. त्यांनी या प्रकरणाची तपशीलवार माहिती घेतली असता या महिलेला जोशी रुग्णालयातील भूलतज्ज्ञाने भूल दिली असल्याची माहिती त्यांना समजली. ही बाब रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत गाडोदिया यांनी मांडली. भूलतज्ज्ञ व्यवसायरोध भत्ता घेत असतानाही खासगी रुग्णालयात व्यवसाय कसा करतो, असा प्रश्न बैठकीत त्यांनी उपस्थित करून भूलतज्ज्ञावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर डॉ. तडवी यांनी भूलतज्ज्ञाला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी तातडीने खुलासा करून खासगी व्यवसाय तात्काळ बंद करावा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे नोटीशीत नमूद केले आहे.

कारवाईची मागणी
दरम्यान या गंभीर प्रकाराची दखल आमदार गीता जैन यांनी घेतली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात या मुद्द्यावर त्यांनी लक्षवेधी सूचना मांडली. भूलतज्ज्ञावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे राज्य सरकार त्यावर काय कारवाई करणार आहे, याची माहिती देण्याची मागणी जैन यांनी केली आहे.

शहरात बेकायदा रुग्णालये
मिरा-भाईंदर शहरात अनेक खासगी रुग्णालये महापालिकेची परवानगी न घेता सुरू आहेत. ती सर्वसामान्य जनतेची लूट करत आहेत, तसेच रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचेही जैन यांनी लक्षवेधी सूचनेत नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.