मुसळधार पावसाचा कहर

मुसळधार पावसाचा कहर

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ८ : रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने रायगडमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. दक्षिण रायगडमधील पोलादपूर, महाड, तळा, म्हसळा या तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अतिवृष्टीमुळे शाळा, महाविद्यालयांना सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली होती. जिल्‍ह्यातील बहुतांश नद्या तुडूंब वाहत असून हवामान विभागाने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्‍यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
किल्ले रायगड परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने किल्‍ल्‍याच्या पायवाटेचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे किल्‍ला ३१ जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रविवारी दुपारपासून सुरू झालेला पावसाचा वेग मध्यरात्रीनंतर चांगलाच वाढला. दरम्यान नागरी वस्तीत शिरलेल्‍या पाण्यामुळे अलिबाग तालुक्यातील मल्याण, रामराज, नेहुली येथील नागरिकांची तारांबळ उडाली. त्याचबरोबर अलिबाग-मुरूड रस्त्यावरील चिकणी पूल एका बाजूने खचला. मुंबई- गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत डोंगरावरील माती रस्त्यावर आल्‍याने वाहतुकीचा वेग मंदावला होता.
जिल्ह्यातून वाहणाऱ्या सावित्री, काळ, अंबा, पाताळगंगा या नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदीकाठच्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सावधानतेचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीमुळे सरकारी कार्यालयांमध्येही शुकशुकाट होता. लांबून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दांडी मारली तर कामानिमित्ताने येणाऱ्यांची संख्याही तुरळक होती. सायंकाळपर्यंत जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली.

भात लागवडीत खंड
मुसळधार पावसाने खाचरात पाणी साचल्याने भातलावणी करण्यासाठी सकाळीच निघालेल्या लोकांना परत यावे लागले. समुद्रकिनाऱ्यालगतच्या भातशेतीमध्ये पाणी ओसलेच नाही. सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा न झाल्‍याने भाताची रोपे पाण्याखाली राहिल्याने कुजण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सर्वाधिक पाऊस (मिमी)
तळा- १३७.७
म्हसळा- २३६.३
श्रीवर्धन- १३२.५
मुरूड २५१.१
महाड- ६६.२


हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पावसाचा वेग वाढत आहे. किल्ले रायगडवर जाण्यास ३१ जुलैपर्यंत जाण्यास बंदी आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्याचा आढावा घेण्यात येत आहे. पावसामुळे आतापर्यंत जीवितहानीची नोंद नाही. सर्वांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सुरू आहे.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com