पावसाने शेतकरी सुखावला

पावसाने शेतकरी सुखावला

वसई, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात पावसाने सोमवारी (ता. ८) दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरणांतील पाणीसाठादेखील वाढू लागला आहे. मंगळवारी (ता. ९) देखील मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. धोक्याच्या ठिकाणी जाऊ नका, असा इशाराही देण्यात येत आहे.

सोमवारी सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली. सतत पाऊस सुरू असल्याने अनेक मार्ग जलमय झाले होते, तर कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले. पालघरमधील नागरिक ज्या धरणांवर पाण्यासाठी अवलंबून आहेत, ती जिल्ह्यातील धरणे व नद्या पावसाने भरू लागली आहेत. वसई-विरार शहरात पावसाने हजेरी लावल्यावर अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.

पाऊस व त्यात मार्गावर पडलेले खड्डे पाहता वाहने सावकाश चालवावी लागत होती. वसई-विरार महापालिकेने पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी यंत्रणा कामाला लावली. त्यामुळे अनेक मार्गांवरचे पाणी कमी झाले व वाहतूक सुरळीत झाली होती.

काही दिवसांपासून पावसाने हवी तशी सुरुवात केली नव्हती. ठाणे जिल्ह्यात पाऊस चांगला झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालघरमध्ये पाऊस दाखल झाला व शेतकरी राजादेखील सुखावला आहे. शेतीला पूरक वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी लावणीच्या कामाला लागला आहे.

वाहनांत बिघाड
पावसामुळे वाहनांमध्ये पाणी शिरल्याने प्रवास करताना वाहनांत बिघाड झाल्याचे दिसून आले. त्यामुळे चालकांना वाहने थेट गॅरेजमध्ये न्यावी लागली. वाहन दुरुस्तीसाठी गॅरेजमध्येदेखील रांगा लागल्या होत्या. प्लगमध्ये पाणी शिरणे, इंजिन बिघाड, ब्रेकसह क्लच नादुरुस्ती अशा प्रकाराने वाहनचालक त्रस्त झाले होते.

आजही मुसळधारेचा इशारा
पालघर जिल्ह्यात सोमवारी जोरदार पाऊस झाला. मंगळवारी (ता. ९) देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती कक्ष विभागाला सज्ज केले आहे. १० ते १२ जुलैदरम्यान काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

४१२ मिमी पावसाची नोंद
आतापर्यंत पालघर जिल्ह्यात ४११.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा ८९.२ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात पावसाने दमदार सुरुवात केली, तर धरणे तुडुंब वाहून जातील व वर्षभराची पाण्याची चिंता मिटणार आहे, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे.

पावसाची टक्केवारी
वसई ६४.६
वाडा ८९.४
डहाणू ८३
पालघर ९३.८
जव्हार ५०.३
मोखाडा ४६.२
तलासरी ७८.४
विक्रमगड ७१.३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com