नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचारामुळे मुंबई तुंबली

नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचारामुळे मुंबई तुंबली

Published on

नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचारामुळे मुंबई तुंबली : वर्षा गायकवाड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण उडाली असून मुंबईच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे आज पुन्हा हाल झाले. मुंबईतील मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याचे पालिका आणि राज्य सरकारचे दावे मुसळधार पावसात वाहून गेले. महायुतीचे सरकार हे धादांत खोटे बोलणारे असून नालेसफाईच्या आणि मॉन्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा झाल्यामुळे मुंबई तुंबून नागरिकांना नाहक त्रास झाल्याची टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.

गायकवाड म्हणाल्या की, मुंबई पहिल्याच मोठ्या पावसात अक्षरशः तुंबली, अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले, शहराच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कामाच्या वेळी वाहतूक कोंडी झाली. मिलन सबवे, अंधेरी सबवे, दहिसर सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फूट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग, तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, विद्याविहार, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर या ठिकाणच्या सखल भागांत पाणी मोठ्या प्रमाणात साचून नागरिकांची मोठी गैरसोय झाली. त्याला जबाबदार महायुती आणि पालिकेतील भ्रष्ट कारभार असल्याची टीका त्यांनी केली आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल सेवेचाही बोजवारा उडाला. भांडुप, कांजूरमार्ग, वडाळा, जीटीबी, माटुंगा रोड, दादर, कुर्ला, शिव यांसारख्या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे तिन्ही रेल्वे लाईनवर मोठा परिणाम झाला. रेल्वे प्रशासन व राज्य शासन यांच्यात योग्य समन्वय नसल्याने रेल्वे कोलमडली. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण? याचे उत्तर राज्य शासन, पालिका आणि रेल्वे प्रशासनाने द्यावे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

...
राज्यात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या धनदांडग्यांच्या गाड्यांखाली निष्पाप लोक बळी पडत असून अशा घटनांत वाढ होत आहे. पुणे, नागपूर, जळगाव आणि आता मुंबईत घडलेली घटना चिंताजनक आहे. वरळीतील ४५ वर्षीय महिलेचाही गाडीखाली चिरडून मृत्यू झाला. दोषींना अटक करून कडक शिक्षा करावी.
- वर्षा गायकवाड, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.