म्हाडाला घरांची लॉटरी

म्हाडाला घरांची लॉटरी

Published on

म्हाडाला घरांची लॉटरी
शिवशाही प्रकल्पातील ७०० घरे संक्रमण शिबिरासाठी उपलब्ध

बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे बांधणाऱ्या म्हाडाला आता ७०० घरांची लाॅटरी लागली आहे. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची उपनगरात असलेली घरे आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांना देता यावीत, म्हणून ती म्हाडाला दिली जाणार आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना येथे स्थलांतरित करण्यासाठी किंवा संक्रमण शिबिरासाठी वापर करता येणार आहे.

शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची धारावीत असलेली सुमारे ३३४ घरे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतलेला असतानाच आता उपनगरातील घरेही म्हाडाला दिली जाणार असल्याचे समोर आले आहे. उपनगरात मुलुंड, कांदिवली, भांडुप, मानखुर्द, नाहूर, गोरेगाव अशा वेगवेगळ्या १७ ठिकाणी जवळपास ७०० घरे आहेत. ही घरे आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याकरिता किंवा संक्रमण शिबिरासाठी राखीव ठेवण्यात आली होती. म्हाडाने या घरांची मागणी केल्याने शिवशाहीने त्यांना देण्याबाबतचे पत्र दिले आहे. त्यामुळे म्हाडाला या घरांचा आपल्या सोयीनुसार वापर करता येणार आहे. दरम्यान, ही घरे परत करण्याच्या अटींवर विनामूल्य दिली जाणार आहेत.

२२५ चौरस फुटांची घरे
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या म्हाडाला देण्यात येणारी घरे २२५ चौरस फुटांची आहेत. गेल्या काही दिवसांपासून ती बंद असल्याने त्याची काहीअंशी दुरुस्ती करावी लागणार आहे.

..
शिवशाही प्रकल्पाची उपनगरात ठिकठिकाणी घरे असून ती आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवली होती. म्हाडाने या घरांची मागणी केल्याने ती त्यांना देण्याबाबतचे पत्र दिले आहे.
- गुलाब खरात, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.