खासदारांसमोर वाचला रेल्वे समस्यांचा पाढा

खासदारांसमोर वाचला रेल्वे समस्यांचा पाढा

Published on

खासदारांसमोर वाचला रेल्वे समस्यांचा पाढा

किन्हवली, ता. ९ (बातमीदार) : अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेच्या आसनगाव व अन्य स्थानकांचा विकास प्रलंबित असून प्रवाशांची गैरसोय होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, तसेच आसनगाव ते कसारा रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सोमवारी (ता. ८) आसनगाव स्थानकाच्या भेटीदरम्यान प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी व रेल्वे अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे यांनी बुधवारी शहापूरच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या आसनगाव रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी प्रवाशांनी, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन आणि कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे समस्यांचा पाढाच वाचला. यावर रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करताना कल्याण-कसारादरम्यान तिसरी व चौथी मार्गिका मंजूर असूनही कासवगतीने काम सुरू आहे, यावर खासदार सुरेश म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मागील १० वर्षांत लोकसंख्या वाढली; मात्र लोकलची संख्या वाढली नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेकदा ताटकळत रहावे लागते, लोकल गाड्या ताटकळत ठेवून मेल, एक्स्प्रेस व मालगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने कार्यालयात उशिरा गेल्यावर लेट मार्क लागतो. त्यामुळे लोकलची संख्या वाढवावी, ठाणे ते आसनगाव रेल्वे शटल सेवा सुरू करावी, २०१८ मध्ये कसारा दिशेकडील तोडलेल्या पुलाची पुनर्बांधणी करावी, पूर्वेकडे सरकता जिना व पूल तयार करणे, आसनगाव रहिवाशांना पूर्वेकडे जाण्यासाठी पूल तयार करणे, कल्याण ते कसारादरम्यान प्रत्येक स्थानकात स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होते, आदी समस्या मांडल्या. यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रमुख सल्लागार नंदकुमार देशमुख, विजय देशेकर, जितेंद्र विशे, राजेश घनघाव, आरती भोईर, मिना फर्डे, उमेश विशे, शैलेश राऊत आदी उपस्थित होते.


छायाचित्र
किन्हवली :- खासदार सुरेश म्हात्रे यांनी आसनगाव स्थानकाला भेट दिली असता त्यांचे प्रवासी व प्रवासी संघटनांनी स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.