ठाणे थोडक्यात

ठाणे थोडक्यात

भिवंडीत लसीकरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन
भिवंडी (बातमीदार) : सरोजिनी महिला उत्कर्ष संस्थेतर्फे भिवंडी शहरातील पाच वर्षांपर्यंतच्या बालकांना विविध आजारांपासून वाचवण्यासाठी नियमित लसीकरणासंदर्भात ‘युनिसेफ’च्या सहकार्याने नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हॉटेल रामदेव बाइट्सच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. सरोजिनी महिला उत्कर्ष संस्थेच्या अध्यक्षा सुजाता सरके यांनी प्रास्ताविकात म्हटले आहे की, लसीकरणाचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. इकराम यांनी विद्वानांना मशिदी आणि मदरशांतून लसीकरणाचे महत्त्व सांगण्यासाठी आमंत्रित केले आहे. कारण लोक तुमचे शब्द ऐकतात, त्यावर विश्वास ठेवतात. तुम्ही या लसीकरण मोहिमेबाबत आजूबाजूच्या लोकांना आवाहन करू शकता. लसीकरणाबाबत ‘युनिसेफ’चे वरिष्ठ सल्लागार डॉ. आर.के. खरात व डॉ. किशोर चौहान यांनी माहिती दिली. भिवंडी शहराच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बुशरा सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले. त्याचप्रमाणे भिवंडीतील अभ्यासकांचे सहकार्य मोलाचे ठरल्याचे सांगितले.
............................
५० हजार विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्यांचे वाटप
मुरबाड (बातमीदार) : माजी आमदार गोटीराम पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील ५० हजार शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत मोफत वह्यांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच, शाळा, महाविद्यालय, गावपातळीवर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले. जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक ॲप्लिकेशन देण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमाबरोबर करिअर मार्गदर्शन मोफत देण्यात आले आहे. तसेच, नागरिकांचा विमा उतरवणे, आरोग्य तपासणीसारखे महत्त्वाचे कार्य प्रतिष्ठान सातत्याने करीत आहे.
........................
बेल्जियम येथील जागतिक स्केटिंग स्पर्धेत आस्था व देवांशची निवड
कल्याण (वार्ताहर) : लोककल्याण पब्लिक स्कूलच्या आस्था नायकर व सेंट मेरी शाळेच्या देवांश राणे फलेंडर ग्रँड प्रिक्स या जागतिक स्केटिंग स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राज्यातून आस्था आणि देवांश या दोघांची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. तर भारताच्या संघात एकूण १२ खेळाडू आहेत. ऑलिंम्पिकमधील सुवर्णपदक विजेते विलेन बार्टस्वींग दे त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथे मागील पंधरा दिवस दोघेही सराव करत होते. आस्था आणि देवांशला राज्य स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष पुष्पेद्र सिंग, श्रीपाद शिंदे, पवन ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. जागतिक स्पर्धेसाठी आस्था आणि देवांशला राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, सुलभा गायकवाड, प्रा. लक्ष्मण इंगळे, छत्रपती पुरस्कार विजेते अंकुर आहेर, सुभाष गायकवाड यांनी भेटून शुभेच्छा दिल्या. आस्था चार वर्षांची असल्यापासून स्केटिंग या खेळामध्ये सराव करत आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर तिची झालेली निवड ही खरेच आमच्या कुटुंबासाठी आनंदाची बाब असून पुढेही तिने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त करत देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी प्रतिक्रिया आस्थाची आई सुप्रिया नायकर यांनी दिली. तर देवांश स्केटिंग खेळाला सुरुवात केल्यानंतर एवढी मोठी मजल मारेल, ही अपेक्षा नव्हतीच. त्यांनी घेतलेली मेहनत आणि केलेला सराव कौतुकास्पद आहे. या स्पर्धेत नक्कीच यश प्राप्त करेल, अशी मला खात्री असल्याचे देवांशचे वडील अविनाश राणे यांनी सांगितले.
....................
जीवनदीप महाविद्यालयात रानभाजी पाककला स्पर्धा
कल्याण (वार्ताहर) : जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या वतीने रानभाज्या पाककला स्पर्धेच आयोजन जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे सोमवारी (ता. ८) करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना, भूगोल विभाग, ग्रीन क्लब आणि महिला विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या प्रदर्शन आणि रानभाज्या पालकाला स्पर्धा आयोजित केली होती. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण दक्षता मंडळाचे सुभाष इसामे, देवराई समन्वयक देवेश जाधव, तसेच जीवन शैक्षणिक संस्थेच्या संचालिका स्मिता घोडविंदे यांची उपस्थिती लाभली. या स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः रानावनात जाऊन निसर्गातील विविध भाज्यांची ओळख करून घेतली. सुभाष ईसामे यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या आणि त्यांच्या औषधी गुणधर्माविषयी मार्गदर्शन केले. तसेच, स्मिता घोडविंदे यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रेरित केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सानिका मुथोलकर, द्वितीय क्रमांक दक्षा लांडगे व तृतीय वैष्णवी मिस्त्री हिने पटकावला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. विजय हेराडे, प्रा. दिनेश धनगर, प्रा. जया देशमुख, प्रा. अपर्णा जाधव, प्रा. प्रवीण भालेराव आदींनी मेहनत घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com