सुनील तटकरे : एक दुरदर्षी नेतृत्व

सुनील तटकरे : एक दुरदर्षी नेतृत्व

सुनील तटकरे : एक दूरदर्शी नेतृत्व

लेखक ः महेंद्र दुसार

खासदार सुनील तटकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय रायगडमधील राजकीय चर्चांना सुरुवात होत नाही. जिल्ह्यातील राजकारणावर त्यांचा प्रदीर्घ ठसा उमटला आहे. सुसंस्कृत, अभ्यासू वृत्ती आणि लोकांच्या समस्यांविषयी असलेली कणव या सुनील तटकरे यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. आजपर्यंत सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीत संघटना पातळीवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. म्हणून आजही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुनील तटकरे यांचे नाव आवर्जून घेतले जाते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून महाराष्ट्रात त्यांना ओळखले जाते. एक सरकारी कंत्राटदार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असलेल्या खासदार सुनील तटकरे यांच्या जीवनप्रवासाचा आढावा.

नव्या सत्तासमीकरणात त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. सुनील तटकरे यांचा जन्म १० जुलै १९५५ रोजी रायगडमधील कोलाड येथे झाला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी इंटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले. काही काळ ते शिक्षणासाठी अलिबागमध्येही होते. वडील दत्तात्रेय तटकरे यांचे बोट पकडून त्यांची अगदी तरुणपणातच राजकारणात धडपड सुरू झाली. १९८४ मध्‍ये सुनील तटकरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजकारणात येण्यापूर्वी सुनील तटकरे यांनी काही काळ सरकारी कंत्राटदार म्हणून काम केले. मात्र, लहानपणापासून राजकीय बाळकडूच मिळाल्यामुळे त्यांचा नैसर्गिक ओढा राजकारणाकडेच होता.
तरुणपणी सुनील तटकरे यांनी आपल्या वडिलांसोबत अनेक दौरे केले. दौऱ्यादरम्यान ते दत्ताजीराव तटकरे यांच्या कारचे ड्रायव्हर असत. त्यांचे वडील दत्ताजी तटकरे हे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. जवळपास गेल्या सहा दशकांपासून रोह्यासह रायगड परिसराच्या राजकारणात तटकरे कुटुंबीय सक्रिय आहेत. आदिती आणि अनिकेत तटकरे यांच्या रूपाने आता तटकरे घराण्याची पुढची पिढीही महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरावली आहे.
भौगोलिक रचनेनुसार झालेल्या मतदारसंघाच्या फेररचनेत सुनील तटकरेंचा माणगाव मतदारसंघच बरखास्त झाला. या मतदारसंघातील काही भाग महाड, श्रीवर्धन, पेण मतदारसंघात विभागला गेला. स्वतःचा मतदारसंघ न राहिल्याने २००९ मध्ये श्रीवर्धन मतदारसंघातूनही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवत बाजी मारली. २००४ मध्ये सुनील तटकरे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री झाले. २००८ मध्‍ये ते राज्याचे ऊर्जामंत्री झाले; तर २००९ मध्ये सुनील तटकरे यांच्याकडे अजित पवार यांनी राज्याच्या अर्थमंत्रालयाची धुरा सोपवली. २०१४ मध्ये त्यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, अनंत गीते यांच्याकडून त्यांचा अगदी थोड्या मतांच्या फरकाने पराभव झाला; परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी या पराभवाची परतफेड केली होती. सुनील तटकरे यांच्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघातून सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे भरघोस मताने विजयी झाल्या; तर पुत्र अनिकेत तटकरे विधान परिषदेवर निवडून गेले आहेत.
सुनील तटकरे यांच्या मुत्सद्दीपणाचा दबदबा राज्याच्या राजकारणात निर्माण झालेला आहे. वरच्या पातळीवरील राजकारणाबरोबरच आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या अडीअडचणीही समजून घेतात व अचूक मार्गदर्शन करतात. एवढेच नाही तर दौऱ्याच्या वेळी सोबत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची योग्य ती काळजीही घेतात. त्यामुळे साहेबांच्या संपर्कात आलेला अधिकारी मनापासून व झपाटल्यासारखे काम करत असतो. कार्यक्रमासाठी ज्या वस्तीत, पाड्यात, गावांत, शहरांत जातात, त्या वेळी त्या ठिकाणच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास नावाने किंवा टोपणनावाने हाक मारतात व विचारणा करतात, ही त्यांच्या तीव्र स्मरणशक्तीची प्रचीती. एवढेच नाही, तर या ठिकाणी यापूर्वी आपण स्वतः कधी, कोणत्या योजनेचे उद्‌घाटन अथवा भूमिपूजन करायला आलो होतो, त्याचाही ते उल्लेख करत असतात.
तटकरेसाहेबांना राजकारणाबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक उपक्रम यांची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात तसेच रायगड जिल्ह्यात नाट्यगृह उभारले तसेच मराठी बाणा, जाणता राजा हे महानाट्य, एक सूर एक ताल'' हा विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम चिंचवली-रोहा तसेच मुरूड, अलिबाग, श्रीवर्धन, माथेरान येथे मोठे महोत्सव आयोजित करून लोकांना लाभ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देतात. महिलांसाठी बचत गट, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून भरपूर अनुदान मिळवून दिले आहे. या सर्व उपक्रमांच्या आयोजनांमुळे सुनील तटकरे महिलांना आपले भाऊ वाटतात, तरुणांना आपले मित्र वाटतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व दानशूर व्यक्ती वाटतात. वयोवृद्ध व्यक्तींना ते मुलासारखे वाटतात. आपला-परका, लहान-मोठा, अधिकारी-कर्मचारी, कार्यकर्ता-पदाधिकारी असा कोणताच भेदभाव न ठेवता तटकरे सुहास्य वदनाने प्रत्येकाच्या अडीअडचणी समजावून घेतात व ते काम तडीस नेण्याकरिता यंत्रणाही कामाला लावतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्यास साहेबांविषयीचा जिव्हाळा अधिकच वाढतो व टिकून राहतो.

मदतीला धावून येणारा कैवारी
कोरोना कालावधीत कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना तटकरे कुटुंबीयांनी सढळ हाताने मदत केली. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळ, महाड पूर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य राबवण्याचा सुकाणू साहेबांच्या हातात होता. अडीअडचणींमध्ये केलेल्या मदतीमुळे तटकरेसाहेबांना रायगड मतदारसंघातील लोकांनी मोठ्या मताधिक्याने विजयी केले. त्यांची ही घोडदौड अशीच कायम राहो, अशी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना!

राजकारणात सक्रिय
- सुनील तटकरे यांचे वडील दत्ताजी तटकरे यांनी काँग्रेसमध्ये सरपंचपदापासून ते जिल्हा परिषद विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सांभाळली होती. काँग्रेसमधील वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, ए. आर. अंतुले, शरद पवार या दिग्गज नेत्यांशी दत्ताजीराव तटकरे यांची नेहमीच जवळीक राहिली.
- १० मे १९८४ रोजी वडिलांच्या झालेल्या निधनानंतर हाच राजकारणाचा वारसा पुढे नेत सुनील तटकरे १९८४ पासून काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. काँग्रेस तालुका सरचिटणीस, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशा एक-एक पायऱ्या चढत ते संघटनेत वर गेले.
- १९९५ मध्‍ये माणगाव मतदारसंघातून ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून गेले. त्या वेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची लाट होती. मात्र, तटकरेसाहेब कोकणातून काँग्रेसला विजय मिळवून देणारे एकमेव उमेदवार ठरले होते.
- १९९९ मध्‍ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडल्यानंतर सुनील तटकरे त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर १९९९ आणि २००४ मध्ये ते माणगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com