ठाण्यात लोकमान्यनगरमध्ये भूस्खलन

ठाण्यात लोकमान्यनगरमध्ये भूस्खलन

Published on

ठाणे, ता. ९ (वार्ताहर) : मुसळधार पावसामुळे ठाण्याच्या लोकमान्य नगरमधील भूस्खलनाच्या घटनेनंतर लोकमान्य नगर डेपोची भिंत दुचाकीवर कोसळली, तर तीन हात नाका येथे वन विभागाच्या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीचा भाग खचल्याची घटना घडली. या तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तर भिंत पडल्याने एका दुचाकीचे नुकसान झाले.

ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा नं. ४ येथे राजे शिवाजी शाळेजवळ, तसेच संतोष पाटील नगरमध्ये चाळ क्र. ४ जवळ असलेल्या डोंगरावरची माती खचल्याने भूस्खलन झाले. घटनेची माहिती मिळताच लोकमान्य प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कारभारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी पाहणी केली. चार घरांना धोका निर्माण झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सदरची घरे खाली करण्यात आली आहेत, तसेच घरामधील लोकांची त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याची सोय करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धोकापट्टी लावून बॅरिगेटिंग केले आहे.

ठाण्याच्या तीन हात नाका परिसरातील वन विभागाच्या कार्यालयाची संरक्षक भिंत खचल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी (ता. ८) दुपारी अडीच वाजता घडली. ठाण्याच्या वन विभागाच्या कार्यालयाजवळ एस.टी.जी. स्टार लिविंग कंट्रक्शन कंपनीचे काम सुरू आहे. वन विभागाच्या कार्यालयाची ८० ते ९० फूट लांबीची आणि ६० ते ७० फूट उंचीची संरक्षक भिंत पडली, तर उर्वरित भिंत ही धोकादायक स्थितीत आहे, तर भिंतीच्या लगत असलेली दोन मोठी झाडेदेखील पडल्याची घटना यावेळी घडली. घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी भिंतीलगत धोकापट्टी बांधून बॅरिगेटिंग केले.

कर्मचाऱ्यांमार्फत मदतकार्य
लोकमान्य नगर बस डेपोची संरक्षक भिंत कोसळण्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. संरक्षक भिंत पार्किंग केलेल्या दुचाकीवर पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले. भिंत पडल्याने चार झाडे धोकादायक स्थितीत आहेत. घटनास्थळी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत मदतकार्य करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.