जीर्ण इमारतींचा धोका कायम

जीर्ण इमारतींचा धोका कायम

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : धोकादायक इमारतीचा काही भाग शेजारीच्या चाळीवर कोसळल्याने चाळीतील दोन महिला जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. ८) कल्याणमध्ये घडली. जूनमध्येही कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी भागातील मौलवी कंपाऊंडमधील मुनीर मौलवी या अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याने रस्त्यावरील पादचारी महिला व तिची मुलगी गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनांमुळे कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा मुद्दा दरवर्षी चर्चेत असतो; मात्र त्यावर ठोस अशा उपाययोजना होत नाहीत. तीस ते पस्तीस वर्षे व त्यापेक्षाही जुन्या झालेल्या इमारती कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्वच प्रभाग क्षेत्रात मोठ्या संख्येने उभ्या आहेत. या जीर्ण झालेल्या इमारतींच्या पडझडीचा धोका पावसाळ्यात अधिक असतो.

अनेक ठिकाणी एका बाजूला एक अशा खेटून इमारती उभ्या असतात. त्यामुळे एखाद्या जीर्ण इमारतीचा काम भाग कोसळल्यास आजूबाजूच्या रहिवाशांच्या जीवालादेखील धोका पोहोचण्याची भीती असते. पावसाळ्यात अशा दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासन अतिधोकादायक, धोकादायक इमारतींना नोटिसा धाडतात. यातील अधिकतर इमारती पगडी पद्धतीच्या असल्याने इमारतींवर कारवाई करताना मालक आणि भाडेकरू हा वाद प्रामुख्याने आडवा येतो. जागा सोडल्यास घरावर हक्क राहणार नाही, याची चिंता भाडेकरुंना सतावत असल्याने धोकादायक अवस्थेतील इमारतीचा काही नागरिक घराचा ताबा सोडण्यास तयार नसतात. यंदा १६१ इमारती या अतिधोकादायक अवस्थेत असून ३०४ इमारती या धोकादायक अवस्थेत आहेत. अतिधोकादायक बांधकामे तोडण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत; मात्र काही इमारतीत वास्तव्यास असलेले रहिवासी घर सोडण्यास तयार नसतात.

इमारत मालकावर गुन्हा दाखल
कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी भागात मौलवी कंपाऊंड आवारात मुनीर मौलवी इमारत आहे. ही इमारत चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. या इमारतीची वेळोवेळी देखभाल न केल्याने इमारत धोकादायक झाली आहे. जूनमध्ये या इमारतीचा काही भाग रस्त्यावरून पायी चाललेल्या मेहरूनिस्सा अशपाक शेख आणि त्यांची मुलगी तस्मिया शेख यांच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. याची दखल पालिका प्रशासनाने घेत इमारत मालक शगुफ्ता मौलवी यांच्यावर गुन्हा दाखल केला. पालिकेने प्रथमच इमारत मालकांवर अशा प्रकारे कठोर कारवाई केल्याचे या घटनेमुळे दिसून आले. ही घटना ताजी असतानाच ८ जूनला जोशीबाग भागातील घटनेबाबत काय कारवाई होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com