वृद्ध आईला आपना घरचा आधार

वृद्ध आईला आपना घरचा आधार

Published on

राजीव डाके; सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. १० : कांदिवलीतील एका ९८ वर्षीय मुक्या आणि आंधळ्या आईला तिच्या निर्दयी मुलाने घराबाहेर काढून गावाला पळ काढला आहे. वृद्धापकाळात तिची काळजी घेण्याऐवजी तिला रस्त्यावर सोडून दिल्याने आता ही वृद्धा ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे ''अपना घर चॅरिटेबल ट्रस्ट''च्या आश्रयाला आली आहे. १० जुलै हा मातृ सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो; मात्र याच दिनाच्या महत्त्वाला हरताळ फासणारी घटना घडली आहे.

मुंबईतील कांदिवली येथे राहणारी वृद्ध महिला सध्या दिवा येथे वृद्धाश्रमात राहत आहे. कोरोना काळात मुलगा आणि सुनेने तिला घराबाहेर काढून गावी पळ काढला होता. त्यावेळी कोरोनाच्या काळात सगळीकडे भीतीचे वातावरण असल्याने तिच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. तिला बोलता येत नव्हते, तसेच डोळ्यांनीदेखील दिसत नव्हते. अशा अवस्थेत तिला रस्त्यावर सोडून देण्यात आले होते. काही दिवस तिला तिच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने कसेबसे जेवण दिले, पण कोरोना संसर्गाच्या भीतीने तिलाही वृद्धेला घरात आश्रय देता आला नाही. वृद्ध महिला रस्त्यावर असल्याने काहीजण तिला अधूनमधून जेवण आणून देत होते. अशातच कर्करोग रुग्णांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या कार्यकर्त्याने दिवा येथील आपना घर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सुधीर जाधव यांच्याशी संपर्क साधून रस्त्यावर रहाणाऱ्या वृद्ध महिलेची माहिती दिली. जाधव यांनी तिला दिवा येथील शेल्टरमध्ये आणून सोडण्यास सांगितले. कोरोनाच्या काळात तिला येथे आणण्यात आले. तिच्यावर उपचार करून तिला ठणठणीत करण्यात आले. आता ही वृद्धा ९८ वर्षांची झाली असून स्वतःचे कपडे, स्वतःची कामे स्वतः करते.

शेल्टरमधील तिच्यासारख्या इतर वृद्धांसोबत हसून खेळून राहते. तिला दुसरे डोळे बसवून पुन्हा पाहता येऊ शकते; मात्र त्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया तिच्या वयानुसार अत्यंत जोखमीची असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने ती टाळली आहे, परंतु अशातही ती खूश आहे. आता तिला इथेच रहायचे आहे. मुलगा, सून घरी घेऊन जायला आले तरी जायचे नाही, असेही वृद्धा सांगते, तसेच ते तिला मारायचेदेखील, असेही ती इशारा करून सांगते.

कोरोनाच्या काळात एका कर्करोग रुग्णांवर काम करणाऱ्या संस्थेने ही वृद्ध महिला आमच्याकडे आणून सोडली. त्यावेळी तिची खूप गंभीर अवस्था होती. तिच्यावर उपचार केले. तिची चांगली काळजी घेत आहोत. आश्रमात इतरही काही वृद्ध महिला आहेत. त्यांचे कोणी नातेवाईक आढळून आले नाहीत. या महिलांसोबत ही महिला मिळून मिसळून राहते. सगळ्यांची काळजी घेते. ती इतरांपेक्षा वयाने मोठी दिसत असल्याने आम्ही तिला आक्का असे नाव दिले आहे. आम्ही तिला मॉनिटरदेखील म्हणतो.
- सुधीर जाधव, अध्यक्ष, अपना घर चॅरिटेबल ट्रस्ट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.