महिन्याभरानंतरही खैरतस्कर मोकाट

महिन्याभरानंतरही खैरतस्कर मोकाट

Published on

जव्हार, ता. ९ (बातमीदार) : जव्हार येथील दक्षिण वन विभागाने १२ जून रोजी ६० ते ७० टन खैराचे ओंडके हस्तगत करून संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाला एक महिना उलटला तरीही मुख्य सूत्रधाराला पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश आलेले नाही. या संशयितांचा कुठलाच ठावठिकाणा मिळत नसल्याने त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

जांभूळ विहीर परिसरात फिरत असताना सामाजिक कार्यकर्ते इमरान कोतवाल यांना खैराची लाकडे एका बेकरीजवळ दिसली होती. त्यानंतर त्यांनी ही बाब तत्काळ वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली, मात्र कारवाई करण्यात दिरंगाई केल्याने तस्करांनी अतिशय शिताफीने तीन लॉरी माल गायब केला होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यातील तक्रारीत जव्हार नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ भीकूशेठ पटेल, रफिक घाची यांचा समावेश होता. एक संशयित आरोपी बेकरीचालक राशिद अन्सारी याला वन विभागाने ताब्यात घेतले होते, मात्र जव्हार न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आला. या संशयित आरोपीला अंतरिम जामीन मिळू नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते इमरान कोतवाल यांनी भिवंडी न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला. त्यामुळे न्यायालयाने २६ जून, ३ जुलै रोजीची तारीख दिली असताना संशयित आरोपी हजर राहिला नाही.

मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खैर तस्करीचा साठा शोधून दिला होता. त्याचवेळी तो जप्त केला नाही. या कारवाईसाठी दोन दिवस लावले. त्यामुळे संशयितांना अवधी मिळाला. याच संधीचा फायदा घेत त्यांनी तीन ट्रक खैर माल लंपास केला.
- इमरान कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते

खैर तस्करीप्रकरणी संशयित आरोपींचा अद्याप तपास लागला नाही. ते भूमिगत आहेत. त्यांचा सीडीआरद्वारे शोध घेणे सुरू आहे. ही बाब न्यायप्रविष्ट आहे.
- निरंजन दिवाकर, उपविभागीय वन अधिकारी, जव्हार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.