पर्यटनस्‍थळी जाताय, जरा जपून

पर्यटनस्‍थळी जाताय, जरा जपून

पर्यटनस्‍थळी जाताय, जरा जपून
दीड महिन्यात १५ मृत्‍यू; वर्षासहलींचा आनंद घेताना काळजीही घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९: तीन दिवसांपासून सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धबधबे, धरणे, नद्या ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमींची पावले पर्यटन स्थळांकडे वळू लागली आहेत. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील ही पर्यटनस्थळे जितकी आकर्षक आणि मनाला आनंद मिळवून देतात, तितकीच धोकादायकही आहेत. नवख्या पर्यटकांना अवघड वाटा, निसरडे रस्‍ते यांची कल्‍पना नसते. त्‍यामुळे दुर्घटना घडतात.
मॉन्सून सुरू झाल्यापासून रायगड जिल्ह्यात बुडून मृत्यू झालेल्‍या व्यक्तींची संख्या १५ इतकी झाली आहे. ही जेमतेम दीड महिन्यातील आकडेवारी असून जीवितहानी टाळण्याचे मोठे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासमोर आहे. तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसाने नदी, नाले तुडुंब भरले असून दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी धोकादायक पर्यटनस्थळांवर बंदोबस्त ठेवला आहे, मात्र तरीही काही अतिउत्साही, हुल्लडबाज पर्यटक चोरवाटेने जात आपला जीव धोक्यात घालतात. त्‍यामुळे प्रशासनाने बंदीबरोबर आनंदमय पर्यटनासाठी जनजागृती सुरू केली आहे. पावसाळी पर्यटनातून रोजगाराची संधी उपलब्ध होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही यात सहभाग घेतला जात आहे. पर्यटनाचा आनंद घेताना काय काळजी घ्‍यावी, कुठे जावे, कुठे जाऊ नये, याची माहितीही दिली जात आहे.

काय करू नये
#परिसरात मद्यपान करू नये
#सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकू नये
#धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह टाळावा
# फोटोग्राफी किंवा छायाचित्रणासाठी ड्रोनचा वापर करू नये
#रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकार वाहने चालवणे टाळावे
#धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक टाळावे
#महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, असभ्य वर्तन करणे टाळावे
# मोठ्या आवाजात संगीत डी.जे. वाजवू नये
# पर्यटनस्थळावर लहान मुलांना एकटे सोडू नये.


आवश्‍यक खबरदारी
#हवामानाचा अंदाज घेऊन सहलींचे नियोजन करावे
#पर्यटनासाठी जाणार असल्याची सर्व माहिती घरच्यांना द्यावी
(मित्रांचे मोबाईल क्रमांक, जाण्याचे ठिकाण, जाण्या-येण्याचा मार्ग आणि वेळ)
#पर्यटन किंवा भटकंतीला निघण्यापूर्वी त्या ठिकाणचा भौगोलिक अभ्यास करावा.
#भटकंती किंवा पर्यटनासाठी एकट्याने जाणे टाळावे.
#पाय घसरू नये म्हणून ट्रेकिंगचे बूट वापरावेत
# डिजिटल साधने सुरक्षित ठेवावीत
#भटकंती करताना स्थानिक गाईड किंवा वाटाड्यांना सोबत घ्यावा.
#अंदाज न येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात जाणे व पोहणे टाळावे.
#खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली, प्रथमोपचार किट सोबत असावे.
#सहज वावरता येईल, असे कपडे परिधान करावे


येथे जाऊ शकता
ताम्‍हिणी घाट,फणसाड, सागरगड, जुम्मापट्टी, बेडिसगाव-आडोशी, बोरगाव, परसदरी,
***
येथे जाण्याचे टाळा
देवकुंड, प्लस व्हॅली, पांडवकडा, काशिद समुद्रकिनारा, किल्ले रायगड, झेनिथ धबधबा, आषाणे, पाली-भुतिवली, कोंडाणे, पळसदरी, गाडेश्वर, इर्शाळगड,

गडकिल्ल्यांवरील भटकंती टाळावी
रायगड जिल्ह्यात ऐतिहासिक गड-किल्ल्यांची संख्या मोठी आहे. या गडकिल्ल्यांवरून पावसाळ्यात नयनरम्‍य दृश्य दिसते, ही दृश्य
पाहण्याचा मोह अनेकांना होतो. डोंगरमाथ्यावर असलेल्या गडकिल्लांवर पावसाळ्यात वर्दळ कमी असते, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात झाडीझुडपे उगवतात. त्यामुळे ट्रेकिंगची माहिती असणाऱ्या ग्रुपबरोबरच येथे भटकंती करावी. कुलाबा, पद्मदुर्ग, जंजिरा या जलदुर्गांवर जाण्यासाठी पावसाळ्यात कोणतीही साधने नसल्याने याठिकाणी बेत करू नये.

अनेकवेळा दुर्घटनाग्रस्त व्यक्तीं अतिउत्‍साहात, अति आत्मविश्वासामुळे स्वतःबरोबर इतरांचा जीव धोक्यात घालतात. पोलिस किंवा स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले जाते. पर्यटनस्थळाचा अपुरा अभ्यास, अपुरी तयारी आणि चुकीची संगत अपघातास कारणीभूत ठरतात. हे टाळण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे असून संबंधित ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातील तरुणांची यासाठी मदत घेतली जाते. त्‍यामुळे स्‍थानिक तरुणांना बचावाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
- सागर दहिंबेकर, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था

मान्सून पर्यटनातून स्थानिक नागरिकांना चांगला रोजगार मिळतो. पर्यटनस्थळावर बंदी घालून हा रोजगार बुडू नये म्हणून कायद्याचा बडगा न वापरता पावसाळी पर्यटनात शिस्त आणण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेण्याचे ठरवले आहे. तर काही ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पर्यटनस्थळे धोकादायक झाली आहेत, त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड

गडकिल्ल्यांवरून पावसाळ्यात दिसणारे सौंदर्य खूपच विलोभनीय असते. हे अनुभवण्यासाठी प्रशिक्षित ट्रेकर्स किंवा स्थानिक जाणकार बरोबर असावेत. पावसाळ्यात गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात गवत, झुडपे वाढतात. वाटा निसरड्‌या झाल्‍याने दरडी कोसळण्याचीही शक्यता असते. शिवाय रस्‍ता चुकण्याचीही शक्‍यता असल्‍याने सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
- साईराज पाटील, दुर्गप्रेमी

आपत्कालीन टोल फ्री क्रमांक- १०७७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com