दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी प्रयत्न

दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी प्रयत्न

दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी प्रयत्न
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न असून मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने ५० एमबीबीएस विद्यार्थी क्षमतेची परवानगी दिलेली आहे. उर्वरित नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अर्जात राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी (ता. ९) विधानसभेत दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ‘‘शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता जिल्हा गडचिरोली, जालना, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ (जिल्हा ठाणे) आणि मुंबई (१० संस्था) येथे १०० एमबीबीएस विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली यांना अर्ज सादर करण्यात आले होते. त्रुटींची पूर्तता करण्याची कार्यवाही शासन व संचालनालयस्तरावर सुरू आहे. अध्यापकांची पदे भरण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुरू असून वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि संलग्नित रुग्णालय या संदर्भातील कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तसेच, काही अध्यापकांची पदे कंत्राटी, मानधनावर भरण्यात येणार आहे.’’ त्रुटी दर्शवलेल्या प्रस्तावित नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकरिता राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली यांच्याकडे शासनामार्फत अपील दाखल करण्यात येणार आहे. या अपिलाच्या सुनावणीस शासनाकडून त्रुटी पूर्ततेसंदर्भातील हमीपत्र सादर करून या महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करण्याच्या अनुषंगाने योग्य ते प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
..
सध्या नीट-यूजी-२०२४ची परीक्षा पुढे गेली असल्यामुळे प्रस्तावित नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करून घेऊन या शैक्षणिक वर्षी एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.
- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com