१४ वर्षीय मुलाच्या मेंदूच्या रक्तवाहिनीत रक्ताचा फुगा

१४ वर्षीय मुलाच्या मेंदूच्या रक्तवाहिनीत रक्ताचा फुगा

Published on

१४ वर्षीय मुलाच्या मेंदूच्या रक्तवाहिनीत रक्ताचा फुगा
केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचवले प्राण
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : सोलापूरच्या अकलूजमधून उपचारांसाठी अनेक रुग्णालये फिरलेल्या १५ वर्षीय मुलावर अखेर मुंबई पालिकेच्या केईएम रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले. या मुलाला आलेल्या पिडियाट्रीक स्ट्रोकमुळे त्याची उजवी बाजू निकामी आणि कमजोर झाली होती.
चक्कर, उलट्या, बेशुद्धावस्था आणि बोलण्यात अडथळा ही लक्षणे घेऊन हा मुलगा केईएम रुग्णालयात मार्चच्या अखेरीस दाखल झाला होता. आपत्कालीन स्थितीत आलेल्या मुलावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय होता. स्थानिक ठिकाणी उपचार न झाल्याने तिथल्या डॉक्टरांनी त्याला केईएममध्ये नेण्याचा सल्ला दिला.
या मुलाच्या मेंदूच्या रक्तवाहिनीची अवाजवी वाढ झाल्याने मेंदूतील कमकुवत क्षेत्रात धमन्यांच्या भिंतीजवळ सूज, फुगवटा निर्माण होतो. याला ‘ब्रेन एन्युरिझम’ असे म्हणतात. विशेष म्हणजे लहान मुलांमध्ये अशी स्थिती फार दुर्मिळ मानली जाते. या परिस्थितीचे निदान होणे आणि रुग्ण योग्य रुग्णालयात योग्य वेळेत दाखल होऊन उपचार होणे जास्त महत्त्वाचे असते. या मुलावर अत्यंत गंभीर परिस्थितीत शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. केईएम रुग्णालयाच्या इंटरवेशनल न्यूरो रेडिओलॉजीच्या इंचार्ज आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. रश्मी सराफ यांच्या टीमने अचानक सुटीच्या दिवशी रविवारी या मुलावर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
या शस्त्रक्रियसाठी मेडिसिन, भूलतज्ज्ञ, न्यूरोलॉजी, रेडिओलॉजी, आयसीयू संपूर्ण टीम उपस्थित होती. या टीमच्या सहकार्याने तीन फॉलोअपनंतर हा मुलगा आता सर्वसामान्य आयुष्य जगत असून पुन्हा शाळेत जाऊ लागला आहे.
अशी केली शस्त्रक्रिया
या शस्त्रक्रियेसाठी टीमने ट्रेंझा डिवाईसचा वापर केला. हा मुलगा स्ट्रोकच्या ४८ तासांमध्ये केईएम रुग्णालयात दाखल झाला होता. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करणे हेदेखील आव्हानात्मक असते. मेकॅनिकल थ्रोम्बोक्टोमी करण्यात आली. छोट्या मेंदूची एक नस ब्लॉक झाली होती; पण हे तंत्रज्ञान वापरून रक्ताची बंद असलेली नस खुली केली. त्यातली गाठ काढली. काही दिवसांच्या आयसीयू उपचारांनंतर या मुलाला घरी सोडले. आता मुलाचे बोलणे, निकामी झालेली बाजू पुन्हा कार्यरत झाली आहे.

योग्य वेळेत योग्य उपचार आवश्यक
स्ट्रोक, पॅरालिसिस, ब्रेन ॲटॅक हे आजार उपचारांनी बरे होणारे आहेत; पण रुग्ण वेळेवर येणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळेत योग्य उपचार दिल्यास इतर अडथळ्यांवर मात करता येते. मोठ्या मेंदूत जर स्ट्रोक येऊन फुगा तयार झाला असेल, तर ६ ते ९ तासांपर्यंत शस्त्रक्रिया केली जाते. काही रुग्णांमध्ये २४ तासांपर्यंत केली जाते. छोट्या मेंदूत ४८ तासांपर्यंत शस्त्रक्रिया केली जाते. एमआरआय, सिटीस्कॅन करून निर्णय घेतला जातो. कोणत्या उपचारांनी रुग्णाच्या समस्या सुटतील, हे त्या परिस्थितीनुसार ठरवले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.