मसालामार्केटमध्ये समस्यांवरून संताप

मसालामार्केटमध्ये समस्यांवरून संताप

वाशी, ता.९ (वार्ताहर)ः आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असा नावलौलिक असलेल्या एपीएमसी बाजारपेठेतील मसाला मार्केटमध्ये मूलभूत सुविधांची वानवा आहे. व्यापाऱ्यांसह बाजाराशी जोडलेला प्रत्येक घटक स्वच्छता, रस्ते, वीज, पाणी अशा विविध समस्यांनी त्रस्त आहे. याबाबत अनेकदा प्रशासनाशी संवाद साधण्यात आला आहे, पण दिलासा मिळाला नसल्याने संतापलेल्या व्यापाऱ्यांनी एपीएमसी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
बाजाराच्या आवारातील नालेसफाई झाली नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. बऱ्याच वेळा विजेचा पुरवठा खंडित होत असल्याने इंटरनेट सेवेवरदेखील याचा परिणाम होत असून दैनंदिन व्यवहार करताना व्यापाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत, पण कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने एपीएमसी मसाला मार्केटचे संचालक विजय भुटा यांच्या अध्यक्षतेखाली मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई एपीएमसीचे अध्यक्ष अशोक डक यांची मंगळवारी (ता. ९) भेट घेत विविध समस्यांविषयी निवेदन दिले आहे, तसेच समस्या सोडवल्या जात नाहीत, तोपर्यंत सेस आणि सेवा शुल्क भरणार नसल्याचा पवित्रादेखील घेतला आहे.
---------------------------------------
प्रमुख समस्या
पुरुषांचे, तसेच विशेषतः महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे. संध्याकाळी सातनंतर बाजार आवारातील दिवे बंद केले जात असल्यानेदेखील माथाडी कामगार, वाहनचालकांना विविध अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे बाजार परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज बाजारात मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळते, तसेच बाजारातील विविध विभागांशी संपर्क करणारी दूरध्वनी संपर्काची व्यवस्थाही कोलमडल्याने त्यासाठी भरलेले पैसे परत करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
-----------------------------------------------
व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. महिलांचे शौचालय, नालेसफाई यांची कामे सुरू आहेत. पणन विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतर उर्वरित कामेदेखील केली जाणार आहेत, तसेच काही अडचणींमुळे दोन दिवस कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होत नसल्याने चर्चा करून या समस्येवरही तोडगा काढत आहोत.
- पी. एल. खंडागळे, सचिव, एपीएमसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com