आलिशान फ्लॅट बांधकाम व्यवसायिकांनी तिसऱ्याच व्यक्तीला विकल्याचे धक्कादायक प्रकरण

आलिशान फ्लॅट बांधकाम व्यवसायिकांनी तिसऱ्याच व्यक्तीला विकल्याचे धक्कादायक प्रकरण

Published on

विकत घेतलेल्या फ्लॅटची अन्य व्यक्तीस विक्री
सराफा व्यापाऱ्याची फसवणूक

मुंबई, ता. ९ ः सराफा व्यापाऱ्याने विकत घेतलेला वडाळा येथील सुमारे १,२०० चौरस फुटांचा आलिशान फ्लॅट बांधकाम व्यावसायिकांनी दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याचे धक्कादायक प्रकरण रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांकडे तपासासाठी आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३० जूनला कश्यप मेहता, अशोक भरानी, अतुल भरानी आणि आशित बदानी या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
झवेरी बाजार येथे सराफा व्यवसाय करणारे चिराग कामदार आणि त्यांच्या पत्नी मंजिरी यांनी २०१७ मध्ये वडाळा येथे बांधकाम सुरू असलेल्या सनशाईन इन्फिनिटी या प्रकल्पातील दहाव्या मजल्यावर १,२०० चौरस फुटांचा फ्लॅट २५ लाख रुपये आगाऊ देऊन बूक केला. या फ्लॅटची किंमत तेव्हा पाच कोटी रुपये होती. कामदार दाम्पत्याने उर्वरित रक्कम अदा करता यावी, यासाठी आयसीआयसीआय बँकेकडून चार कोटी २० लाख रुपयांचे कर्ज घेतले. कामदार यांना फ्लॅटची नोंदणी करता यावी, या उद्देशाने बँकेने एकूण कर्जाऊ रकमेतील ८५ लाख रुपये अदा केले. उर्वरित रक्कम फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतर दिली जाणार होती.
गेल्या वर्षी कामदार यांना माहिती मिळाली की, त्यांचा फ्लॅट बांधकाम व्यावसायिकांनी आशित बदानी यांना परस्पर तीन कोटी ६५ लाख रुपयांना विकला. ही माहिती मिळताच कामदार दाम्पत्याला धक्का बसला. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या फ्लॅटची त्यांच्या नावे नोंदणी झाली होती. शिवाय तो बँकेकडे तारण ठेवण्यात आला होता. आपल्यासोबत झालेला करार रद्द न करता, आपली ना हरकत न घेता, बँकेतील कर्ज प्रकरण न मिटवता किंवा बँकेला विश्वासात न घेता या फ्लॅटची परस्पर विक्री करून फसवणूक करण्यात आली. कामदार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, २०१८मध्ये मालमत्ता कर न भरल्याने प्रकल्पाचे काम रखडले. पुढे हा प्रकल्प सनशाईन हाऊसिंग कंपनीकडून एस. क्यू. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला. तेव्हा मेहता यांनी आश्वस्त करत आपली ना हरकत घेतली. या नव्या कंपनीकडून वेळोवेळी उर्वरित रक्कम भरण्याबाबत पत्रव्यवहार केला गेला; मात्र प्रत्येक वेळेस मेहता यांनी ताबा मिळाला की रक्कम भरा, असे सांगत या पत्रांना उत्तर देण्याची गरज नाही, असे सांगितले. हा फ्लॅट विकत घेणारे बदानी हे सनशाईन हाऊसिंग कंपनीचे कर्मचारी आहेत. शिवाय मेहता यांचे विश्वासू आहेत. मेहता यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेकदा आपल्यासोबत बैठका घेतल्या होत्या, चर्चा केली होती, असेही कामदार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.
...
तक्रार खोटी असल्याचा दावा
मेहता यांनी याप्रकरणी आपल्या वकिलामार्फत माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मार्च २०१८ मध्ये सनशाईन कंपनी समूहाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सुमारे सहा वर्षांनी ही तक्रार पुढे आली. प्रत्यक्षात राजीनामा दिल्यानंतर मेहता यांचा सनशाईन किंवा एस. क्यू. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि त्यांच्या व्यवहारात सहभाग नाही. उलट २० टक्के रक्कम भरल्यानंतर कामदार उर्वरित रक्कम भरण्यात अयशस्वी ठरले. त्यांच्याकडे उर्वरित रकमेसाठी मागणी करणारी बरीच पत्रे (डिमांड लेटर) पाठवली; मात्र एकालाही त्यांनी उत्तर दिले नव्हते. त्यांनी केलेली तक्रार खोटी असून खंडणी उकळण्याच्या हेतूने प्रेरित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.