पीपल्‍स एज्‍युकेशन सोसायटीमुळे अनेक पिढ्या शिक्षित

पीपल्‍स एज्‍युकेशन सोसायटीमुळे अनेक पिढ्या शिक्षित

Published on

पीपल्‍स एज्‍युकेशन सोसायटीमुळे अनेक पिढ्या शिक्षित
वर्धापनदिन कार्यक्रमात राज्‍यपालांचे गौरवोद्‌गार
मुंबई, ता. १० ः पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही देशातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था असून गेल्या आठ दशकांमध्ये सोसायटीने सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांच्या अनेक पिढ्यांना शिक्षित व स्वावलंबी केले आहे. संस्था आता विविध अडचणींना तोंड देत असून या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्‍या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ७९व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन साेहळा पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. यावेळी राज्यपाल आणि रामदास आठवले यांच्या हस्ते विविध मान्यवरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरवण्यात आले.
रामदास आठवले म्‍हणाले की, दलित बहुजनांच्या सामाजिक उत्थानासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या ऐतिहासिक शिक्षण संस्थेच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्यपालांनी लक्ष द्यावे, असे जाहीर आवाहन आठवले यांनी केले. महामानव क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे देश एकसंध अभेद्य आहे. देश कोणी तोडू शकत नाही. कोणतीही शक्ती संविधान बदलू शकत नाही, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्‍त केले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे रामदास आठवले हे अधिकृत अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेतील कार्यकारिणी अधिकृत असल्याचा निकाल धर्मादाय आयुक्तांनी दोनदा दिला. यासंदर्भात चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे अनेक बैठका झाल्या, मात्र अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. अन्यायाविरुद्ध संघर्ष करीत इथपर्यंत पोहोचलो आहे. मी जर संघर्ष सुरू केला तर सर्व काम बिघडेल, असा इशारा आठवलेंनी यावेळी दिला.
यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, सोसायटीचे विश्वस्त पद्मश्री उज्ज्वल निकम, ॲड. बी. के. बर्वे, सचिव डॉ. वामन आचार्य, सहसचिव डॉ. यू. एम. मस्के, कार्यकारी समिती सदस्य चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटलांबद्दल नाराजी
या कार्यक्रमास महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, मात्र ते या कार्यक्रमाला न येता गुजरातला गेल्याची बाब समोर आल्यानंतर आठवलेंनी स्टेजवरच तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही सरकारसोबत, युतीमध्ये आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याऐवजी अन्य कोणता मोठा कार्यक्रम होता, असा सवाल आठवलेंनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.