भिवंडी बस आगारात खड्डे, चिखल, राडारोडा

भिवंडी बस आगारात खड्डे, चिखल, राडारोडा

Published on

भिवंडी, ता. १० (बातमीदार) : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात भिवंडी एसटी आगार व संपूर्ण परिसरात खड्डे, चिखल आणि सांडपाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे बसमध्ये चढताना तसेच उतरताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थी आणि नोकरदारवर्गाला दररोज बस पकडण्यासाठी या चिखलातून प्रवास करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

भिवंडी एसटी बस स्थानकातून कोकण, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, शिर्डी, ठाणे, वाडा व इतर ग्रामीण भागासाठी शेकडो बस ये-जा करतात. लाखो प्रवासी रोजच या बसमधून प्रवास करतात, परंतु बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना चिखल आणि घाण पाण्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे कपडे खराब होतात. पावसाचे पाणी प्रवाहित होत नसल्याने ते आगारात साचून राहते. हे पाणी अनेक दिवस साचून राहिल्याने प्रवासी, बसचालक आणि वाहकांना चिखलातून आणि पाण्यातून वाट काढून जावे लागते.

पूर्वी आगाराचे पाणी महापालिकेच्या गटारांतून प्रवाहित केले जात होते, परंतु महापालिकेने गटारे साफ केलेली नाहीत, तसेच गटारांसह रस्त्यांची उंची वाढविल्याने आगारात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर एसटी बस महामंडळाचे ठाणे विभागीय कार्यालय आणि बांधकाम विभाग पावसाळ्यानंतर डांबरी रस्ता बनवतात, परंतु मागील पाच वर्षांपासून आगारात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यास कोणतीही उपाययोजना केली जात नाही.

आंदोलनाचा इशारा
भिवंडी एसटी आगारातील या समस्येबाबत शिवसेनेचे (ठाकरे गट) भिवंडी शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी आगार व्यवस्थापक इम्रान पटेल आणि भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. येत्या आठ दिवसांत या समस्येवर कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. शहरप्रमुख प्रसाद पाटील, सचिव महेंद्र कुंभारे यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

भिवंडी आगारात पावसाचे पाणी साचते तसेच आगारात खड्डे झाल्याने नागरिकांकडून तक्रारी आहेत. याचा आमच्या कर्मचाऱ्यांनादेखील याचा त्रास होत आहे. याप्रकरणी एसटी बसच्या ठाणे विभागीय कार्यालयास लेखी कळवले आहे. त्याचप्रमाणे भिवंडी महापालिकेला लेखी पत्र देऊन आगारातील पाण्याचा पालिकेच्या गटारीतून निचरा करण्यासाठी व्यवस्था करण्यास सांगितले आहे; मात्र बांधकाम विभागाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही.
- इम्रान पटेल, आगार व्यवस्थापक, भिवंडी एसटी आगार, भिवंडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.