लाडक्या बहिणीसाठी झीरो बॅलेन्स खाते

लाडक्या बहिणीसाठी झीरो बॅलेन्स खाते

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासह त्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी बँकेचे खाते असणे आवश्यक असल्याने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांमध्ये झीरो बॅलन्स खाते उघडता येणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बुधवारी (ता. १०) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, माजी अध्यक्ष व संचालक भाऊ कुऱ्हाडे, शिवाजीराव शिंदे, बाबाजी पाटील, संचालक अनिल मुंबईकर, निवृत्ती घुसेकर, दसु रड्या, संचालिका रेखा पाष्टे, बँकेचे सीईओ अरुण गोंधळी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोई-सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी व आत्मनिर्भरण करणे, तसेच महिला व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य व पोषणस्थितीत सुधारणा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील महिलेला मिळावा, यासाठी अर्ज भरून घेण्यात येत आहे. तसेच, अर्ज भरताना त्यात बँक खात्याची माहिती भरणेदेखील गरजेचे आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ११७ शाखांमधून यातील पात्र महिलांचे झीरो बॅलन्स खाते उघडून देण्यात येणार आहे. सध्या बँकेत ३७ हजार महिला बचत गटांची खाती असून त्यात सुमारे सात लाख महिलांची खाती असल्याची माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली.

१७४ कोटींचे कर्ज वितरित
दरम्यान, ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी, त्यांच्या साधनसामग्री घेण्यासाठी आवश्यक असलेले कृषीकर्जदेखील बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी मेळाव्यातून जनजागृती करण्यात आली. तसेच, बँकेच्या वतीने २६ हजार ६५४ शेतकऱ्यांना २०२४-२५ या कालावधीत १७४.२५ कोटींची कर्ज वितरित केल्याचेदेखील पाटील यांनी सांगितले. तसेच, ३१ मार्च २०२४ अखेर बँकेचा संमिश्र व्यवसाय १३,१५५ कोटींचा झाला असून ठेवी ९,०७१ कोटी आहेत. बँकेची एकूण कर्जे ४,०८४ कोटी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com