बुधवार ठरला कोंडीचा दिवस!

बुधवार ठरला कोंडीचा दिवस!

वसई, ता. १० (बातमीदार) : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नेहमीप्रमाणे सकाळी कामावर जाण्यास निघालेल्या नागरिकांना बुधवारी (ता. १०) चक्का जाममुळे कोंडीचा सामना करावा लागला. त्यातच कामावर जाण्यासाठी वाहनेदेखील मिळत नव्हती. त्यामुळे वसईतील विविध थांब्यांवर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. एका वाहनामध्ये मंगळवारी (ता. ९) झालेल्या बिघाडामुळे वाहतूक कोंडीचा हजारो वाहनांना फटका बसला. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत होते.

वसई-विरार शहरात नित्याची कोंडी होत आहे. महापालिकेचे मुख्य कार्यालय, पोलिस ठाणे मार्ग यासह चंदनासार, नालासोपारा- तुळींज, आचोळे मार्ग, वसई- अंबाडी, माणिकपूर मार्ग असो की अन्य रस्त्यावर कोंडीचे ग्रहण निर्माण होत आहे. अशातच वसई पूर्व आणि पश्चिम मार्गावर मंगळवार आणि बुधवारी प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. सिमेंटचे काम करणारे मिक्सर वाहन पूर्वेला उड्डाणपुलाखाली नादुरुस्त झाले होते. त्यामुळे बुधवारी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. वसई पूर्वेकडे सातिवली, वालीव, गावराईपाडा, गोलानी मार्ग, वसई फाटा, महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. मात्र, अनेक चाकरमानी हे अंबाडी, पंचवटी, नवघर, माणिकपूर, शंभर फुटी मार्ग व आजूबाजूच्या मार्गावर वाहनांची वाट पाहत उभे असल्याचे चित्र बुधवारी सकाळी पाहावयास मिळाले. मंगळवारीदेखील अनेक नागरिकांना कोंडीमुळे इच्छितस्थळी जाण्यासाठी तासाभराहून अधिक वेळ लागला होता.

एकीकडे पर्यायी व्यवस्था असणाऱ्या पूर्व-पश्चिम उड्डाणपुलापैकी जुना पूल नादुरुस्त आहे. त्याचे काम पूर्ण होण्यास काही अवधी लागणार आहे. त्यात कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

वाहनतळांची आवश्यकता
रस्ते रुंद केले असले तरी मात्र मार्गाच्या दुतर्फा अनेक वाहने उभी राहतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून वाहनांना जाण्यासाठी मार्ग तोकडे पडत आहेत; परंतु याकडे प्रशासनाने लक्ष घालावे व वाहनतळाची व्यवस्था केल्यास रस्ते मोकळे होतील, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

चाकरमानी त्रस्त
बहुतांश चाकरमानी हे रिक्षाने प्रवास करतात, मात्र कोंडीमुळे पूर्वेकडील रिक्षा पश्चिमेला जात नव्हत्या. अशीच परिस्थिती पश्चिम परिसरात निर्माण झाली. त्यामुळे चाकरमानी हे त्रस्त झाले होते. कोंडीला दूर करण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते.

वसईत प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने पूर्वेला औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी रिक्षा मिळत नाही. त्यामुळे आम्हाला वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोंडी कधी कमी होईल व आम्हाला कामावर जाता येईल, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- सुनीता मासूने, प्रवासी महिला

प्रथम वाहने मिळत नसल्याने नेमकी काय घटना घडली, हे समजत नव्हते. मात्र, कोंडी झाल्याने रिक्षादेखील अडकल्या असल्याने प्रवास करण्यासाठी वाहन मिळत नव्हते. त्यामुळे पश्चिम परिसरात अनेक प्रवासी ताटकळत उभे होते.
- अभय सोनू, चाकरमानी, वसई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com