जुहूतील ‘त्या’ बारवर पालिकेचा हातोडा

जुहूतील ‘त्या’ बारवर पालिकेचा हातोडा

Published on

जुहूतील ‘त्या’ बारवर पालिकेचा हातोडा
अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त; वरळी हिट ॲण्ड रन प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः जुहू चर्च मार्गावरील ‘व्‍हाईस ग्‍लोबल तपस बार’च्या अनधिकृत बांधकामावर आज पालिकेचा हातोडा चालला. वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणानंतर हा बार प्रकाशझोतात आला होता. आरोपी मिहीर शहा याने याच बारमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यपान केल्याचे समोर आल्यावर ही धडक कारवाई करण्यात आली.
जुहू चर्च मार्गावरील ‘व्‍हाईस ग्‍लोबल तपस बार’ने वाढीव, अनधिकृतपणे बांधकाम केल्‍याचे निदर्शनास आले. तळमजल्‍यावरील सुमारे दीड हजार चौरस फुटाच्‍या मोकळ्या जागेत लोखंडी शेड घालून त्‍याचा अनधिकृतपणे वापर तसेच छतावर सुमारे दोन हजार चौरस फूट लोखंडी शेड टाकून छत बंदिस्‍त केल्‍याचे आढळले. त्‍यानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाने अंदाजे तीन हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम तोडले. महापालिकेचे पाच अभियंते, दोन अधिकारी, २० कामगार अशा मनुष्यबळासह एक जेसीबी संयंत्र, इलेक्ट्रिक ब्रेकर, गॅस कटर आदी संसाधनांच्या साह्याने ही कारवाई करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता. तसेच राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे अधिकारीदेखील या कारवाईच्या वेळी उपस्थित होते.
...
मोहीम तीव्र
पुण्यातील पोर्शे हिट ॲण्ड रन प्रकरणानंतर नियमावली मोडणाऱ्या बार, पबवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला मद्य दिल्याप्रकरणी पुण्यातील बार जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर वरळी हिट ॲण्ड रॅन प्रकरणानंतर जुहू येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम पालिकेने तीव्र केली आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जुहू आणि परिसरामध्ये अशाप्रकारे निर्माण झालेली अनधिकृत बांधकामे निष्कासित करेपर्यंत ही मोहीम सुरूच राहील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
...
बारला टाळे
उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने या बारची दोन दिवस तपासणी केली. घटनेच्या दिवशीच या बारचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला होता. मुंबईत सर्व बार दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे; मात्र या बारमधून आरोपी मिहीर शहा हा रात्री दीडनंतर बारच्या बाहेर पडताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. परवाना निलंबनाच्या कारवाईनंतर मंगळवारी या बारला उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. पुढच्या सुनावणीपर्यंत हा बार बंद राहणार असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
...
बारवर बुलडोझर चालला; मात्र आरोपी मिहीर शहा याच्या घरावर बुलडोझर चालणार का? कधी चालणार?
- आदित्य ठाकरे, नेते, शिवसेना (ठाकरे गट)
.....
कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. जो गुन्हेगार आहे, त्याला सोडणार नाही. या प्रकरणात सर्व प्रकारची कारवाई आम्ही करू.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.