संक्रमण शिबिरांसाठी ‘केअर टेकर’

संक्रमण शिबिरांसाठी ‘केअर टेकर’

Published on

संक्रमण शिबिरांसाठी ‘केअर टेकर’
म्‍हाडाने नेमले सुरक्षा रक्षक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी म्हाडाची संक्रमण शिबिरे आहेत. त्यामध्ये रिक्त असलेल्या गाळ्यांमध्ये घुसखोरी होऊ नये, यासाठी म्हाडाने कंबर कसली आहे. त्यानुसार खासगी एजन्सीच्या माध्यमातून संक्रमण शिबिराच्या ठिकाणी ‘केअर टेकर’ नेमले आहेत. त्यामुळे एखाद्या रिकाम्या गाळ्यात घुसखोरी होत असल्‍यास त्यावर तत्काळ कारवाई करणे म्हाडाला शक्य होत आहे.
म्हाडाची मुंबईत ३४ संक्रमण शिबिरे असून त्यामध्ये जवळपास २० हजार गाळे आहेत, तसेच म्हाडाला शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या ७०० सदनिका संक्रमण शिबिरासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या गाळ्यांमध्ये घुसखोरी होऊ नये, यासाठी म्हाडाने विशेष खबरदारी घेतली आहे. ‘भारत सेक्युरिटी’ या खासगी एजन्सीच्या माध्यमातून संक्रमण शिबिराच्या ठिकाणी जवळपास १२५-१३० केअर टेकर तैनात केल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आता संक्रमण शिबिरात होणाऱ्या घुसखोरीला चाप बसणार आहे. दरम्यान, संक्रमण शिबिरात घुसखोरी झाल्यास संबंधितांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान असते, त्यापेक्षा घुसखोरी होऊच नये म्हणून ‘केअर टेकर’ नेमणे कधीही चांगले, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

तत्काळ कारवाई होणार
याआधी संक्रमण शिबिरातील गाळ्यात झालेली घुसखोरी म्हाडाला तत्काळ कळत नव्हती. त्यामुळे त्यांना बाहेर काढताना कायदेशीर आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता, मात्र आता घुसखोरी होऊ नये, यासाठी ‘केअर टेकर’ नेमले आहेत. त्यानंतरही घुसखोरीचा प्रकार घडत असेल, तर संबंधित केअर टेकरने त्याची माहिती दिल्यानंतर तत्काळ कारवाई केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.