मिहीर शहाच्या चेहेऱ्याचा कायापालट

मिहीर शहाच्या चेहेऱ्याचा कायापालट

मिहीर शहाच्या चेहेऱ्याचा कायापालट
खटला कमकुवत करण्याचा प्रयत्न? पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई, ता. १० ः वरळी ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहीर शहा याने अटक लांबवण्याचीच नव्हे; तर भविष्यात आपल्याविरोधात चालणारा खटलाही कमकुवत करण्याची जय्यत तयारी केल्याचे उघड होत आहे. त्याच अनुषंगाने मिहीरला केस, दाढी, मिशी भादरून चेहऱ्याचा कायापालट करण्याची कल्पना कोणी दिली, त्याने हे कर्तन कुठे, कोणाकडून करून घेतले याबाबत पोलिसांचा चौकशी व तपास सुरू आहे.
बुधवारी वरळी पोलिसांनी दंडाधिकारी सुहास भोसले यांच्या दालनात हजर केलेला मिहीर आणि समाज माध्यमांवरील त्याची छायाचित्रे यातील तफावत ठळकपणे जाणवत होती. तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चेहऱ्यातील बदल करून ओळख लपविण्यामागे गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना संभ्रमित करावे, त्यायोगे खटला कमकुवत करावा, असा हेतू असू शकतो. याआधीही ओळख परेडमध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ओळख पटवू न शकल्याने आरोपीची सुटका झालेली आहे किंवा न्यायाधीशांच्या मनात संशय निर्माण करण्यात आरोपी यशस्वी ठरले आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
अपघात घडला तेव्हा मिहीर गाडी चालवत होता, हे सांगणारा या गुन्ह्यातील फिर्यादी प्रदीप नाखवा यांच्याव्यतिरिक्त अन्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अद्याप पुढे आलेला नाही. अपघातात नाखवा जखमी झाले, तर त्यांच्या पत्नी कावेरी यांचा मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिली तेव्हा नाखवा दाम्पत्य मिहीर चालवत असलेल्या बीएमडब्ल्यूच्या बोनेटवर आले. बोनेटवरून खाली पडण्याआधी प्रदीप यांनी गाडी चालवणाऱ्या मिहीरला पाहिले होते; मात्र भारतीय साक्ष अधिनियमातील तरतुदीनुसार घेण्यात येणाऱ्या ओळख परेडमध्ये नव्या अवतारातील मिहीरची नाखवा ओळख पटवू शकतील का, याबाबत पोलिसांच्या मनातही साशंकता आहे.
बुधवारी दंडाधिकारी न्यायालयात मिहीर याला हजर केल्यानंतर तपास अधिकाऱ्याने सर्वप्रथम त्याच्या बदललेल्या चेहऱ्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. मिहीरने ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याचे अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले. तसेच आरोपी मिहीर आणि अपघात घडला तेव्हा गाडीत उपस्थित असलेला राजऋषी बिडावत यांच्या जबाबांमध्ये तफावत आहे. अपघात घडला तेव्हा कोण गाडी चालवत होते, याबाबत दोघांचे जबाब परस्परविरोधी असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर मिहीरच्या चेहरेपालटाकडे पोलिस गांभीर्याने पाहत आहेत.
...
सराईत गुन्हेगाराप्रमाणे जय्यत तयारी
अपघातानंतर गाडीचा ताबा चालकाकडे देणे, गोरेगाव येथील प्रेयसीचे घर सोडल्यानंतर स्वतःचा फोन बंद करणे. कुटुंबीयांसह मित्र परिवारालाही फोन बंद करण्यास भाग पाडणे, ही सराईत गुन्हेगाराची लक्षणे असल्याचे तपासकर्ते पोलिस सांगतात. पसार आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या कुटुंबावर दबाव आणला जातो. अनेकदा कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवले जाते. कुटुंबीय, मित्र परिवारामार्फत ठावठिकाणा लागू शकतो, हे लक्षात घेऊन ही खेळी करण्यात आली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मिहीरचे आजी-आजोबाही पालघर येथील घर बंद करून अन्यत्र गेले होते. शहापूर येथील रिसॉर्टवर पोलिस पोचताच मिहीरचा ठावठिकाणा पोलिसांना लागला होता.
...
मिहीर शहाला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
मिहीर शहा याला शिवडी येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मिहीर आणि बिडावत यांच्या जबाबात तफावत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे दोघांना समोरासमोर ठेवून चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच अपघातानंतर मिहीरने कोणाकोणाशी संपर्क साधला, कुठे कुठे गेला, कोणी त्याला लपण्यात मदत केली, ही माहिती मिळवण्यासाठी त्याची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत न्या. सुहास भोसले यांनी मिहीरला १६ जुलैपर्यंत कोठडीत धाडले.
...
परवान्याची शोधाशोध
मिहीरकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का, याबाबत वरळी पोलिस तपास करत आहेत. मिहीरने चौकशीत आपल्याकडे परवाना असल्याचे सांगितले आहे; मात्र अद्याप मिहीर किंवा त्याचे कुटुंब परवाना पोलिसांसमोर ठेवू शकलेले नाहीत. त्यामुळे मिहीरकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडून माहिती मागवली आहे.
...
‘मी गाडी चालवत होतो...’
प्राथमिक चौकशीत मरीन ड्राईव्हहून परतताना मी गाडी चालवत होतो, असे मिहीरने कबूल केले आहे, अशी माहिती तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली; मात्र अपघात घडला तेव्हा तो गाडी चालवत होता का, याबाबत मात्र या अधिकाऱ्याने माहिती देणे टाळले. आमच्याकडील घटनाक्रम आणि मिहीरने दिलेली माहिती यात अनेक ठिकाणी तफावत आढळली. त्यामुळे त्याने केलेला प्रत्येक दावा तपासला जाणार आहे. अपघात घडला तेव्हा मिहीर दारू किंवा अमली पदार्थांच्या नशेत होता का, याचाही तपास होणार आहे.
...
‘जे. जे.’त वैद्यकीय चाचणी
विरारहून ताब्यात घेतल्यानंतर मिहीरची जे. जे. रुग्णालयात अटकपूर्व वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. हे नमुने पुढील चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.
...
संबंधित सर्वांची चौकशी होणार!
अपघातानंतर मिहीरला आश्रय देणाऱ्या, पळवून लावण्यात मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जाईल, असे पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com