झोपडी हस्तांतराबाबत अभय योजना लवकरच

झोपडी हस्तांतराबाबत अभय योजना लवकरच

Published on

झोपडी हस्तांतराबाबत अभय योजना लवकरच
उपमुख्यमंत्र्यांनी घेतली विधान भवनात उच्चस्तरीय बैठक
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १० : मूळ मालकाकडून झोपडी विकत घेणाऱ्या नव्या मालकालाही पात्र मानत घर दिले जाण्याबाबत शासन अनुकूल आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. २०-२५ वर्षे झोपडपट्टी पुनर्विकास योजना रखडल्याने मालकी हक्क विकले गेले; परंतु नवे मालक सवलतीस पात्र नसल्याने अनेक कुटुंबांना घराचा लाभ मिळणे शक्य नव्हते. आता हा पेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाले. त्यानंतर विकल्या जाणाऱ्या झोपडी हस्तांतरणासाठी अभय योजना लवकर जाहीर होण्याची शक्यता असून याबाबत बुधवारी विधान भवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना २० ते २५ वर्षे रखडल्या आहेत. या योजनांचे अंतिम परिशिष्ट-२ जाहीर झाल्यानंतर झालेली हस्तांतरणे मान्य करण्याची कोणतीही तरतूद प्रचलित शासन निर्णयामध्ये नाही. आता परिशिष्ट जाहीर झाल्याने मध्यंतरी कौटुंबिक अडचणीमुळे अनेकांनी झोपड्या विकल्या. त्या त्यांच्या नावावर नसल्याने या योजनेवरही त्यांचा परिणाम झाला. ही बाब मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशीष शेलार यांनी लक्षात आणून देत गेल्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली. यावर मुंबईचे सर्वपक्षीय आमदार एकवटले होते. त्यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अभय योजना जाहीर करत अधिवेशनावेळी बैठक घेण्याचे घोषित केले होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्यासह संबंधित अधिकारी व मुंबईतील आमदारांच्या उपस्थितीत ही बैठक विधान भवनात झाली. या बैठकीत अभय योजनेच्या नियम, नियमावलीवर चर्चा करण्यात आली. सरकार याबाबत योजनेचा आराखडा तयार करीत असून ही योजना लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
---
आम्ही ज्या विषयाचा पाठपुरावा करीत आहोत तो मुंबईकरांचा एक विषय निर्णायक टप्प्यावर आला आहे. आज याबाबत तातडीने बैठक घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानतो.
- अॅड. आशीष शेलार, आमदार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.