ठाण्याला आजाराचा फेरा

ठाण्याला आजाराचा फेरा

Published on

ठाण्याला आजाराचा फेरा
ठाण्यात पावसाचा जोर वाढताच आता आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. डेंगी, मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत; तर दुसरीकडे आता कॉलरा, टाफाईडने ठाणेकर बेजार झाले आहेत. यात स्वाईन फ्लूची भर पडली आहे. झपाट्याने पसरणाऱ्या या संसर्गजन्य आजाराचाही ठाण्यात शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे पावसाचा आनंद घेताना ठाणेकरांनो जरा जपून, असा सल्ला पालिकेच्या आयुक्तांनी दिला आहे.


स्वाईन फ्लूने वाढवली चिंता
जूनमध्ये आढळले ७० रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : रात्री पाऊस आणि दिवसभर कडकडीत ऊन, असा निसर्गाचा विचित्र खेळ सध्या सुरू आहे. त्यामुळे रोगराई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच आता ठाणे पालिका क्षेत्रात जूनमध्ये स्वाईन फ्लूने शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. एका महिन्यात शहरात तब्बल ७० स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागात झाली आहे. या रुग्णांवर विविध रुग्णालयांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान सर्दी, तापाची लक्षणे असलेला हा संसर्गजन्य आजार अधिक बळावण्याची शक्यता असून पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य आजार असून एचवन एनवन व्हायरसमुळे त्याची लागण होते. २००९ मध्ये जागतिक आरोग्य विभागाने या आजाराला संसर्गजन्य म्हणून घोषित केले होते. कोरोनाप्रमाणेच शिंका, खोकल्याद्वारे या आजाराचे विषाणू हवेत पसरतात व रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतरांना त्याची लागण होते. हवेत आठ तास जिवंत राहणाऱ्या या विषाणूचे संक्रमण झपाट्याने वाढते. सुरुवातीला व्हायरल सर्दी, खोकला जाणवतो; पण हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.

वास्तविक दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर किंवा पावसाळ्यात स्वाईन फ्लू बळावत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वर्षी ठाणे पालिका क्षेत्रात ८७ रुग्ण स्वाईन फ्लूचे आढळले होते; तर यावर्षी जूनमध्ये ७० रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात १५ जूनपर्यंत ४३२ रुग्ण आढळले होते. त्यात ठाण्यातील ७० रुग्णांची भर पडली आहे. दहीहंडी, गणपती असे सार्वजनिक उत्सव तोंडावर असताना स्वाईन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून सतर्क राहणे आवश्यक आहे, असे आवाहन पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

पालिका रुग्णालयात स्वतंत्र कक्ष
ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्लूसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. येथे रुग्णांच्या विलगीकरणापासून औषधोपचाराची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना सर्व खासगी रुग्णालयांनाही देण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी दिली.

लक्षणे
ताप येणे, हुडहुडी भरणे, सर्दी होऊन नाक वाहणे, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोके, पोट दुखणे, मळमळ, उलटी ही स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आहेत. ६५ वर्षांपुढील ज्येष्ठांना आणि लहान मुलांना, गर्भवतींना किंवा किडनी, मधुमेह असलेल्या रुग्णांना याचा धोका अधिक असतो.

अशी घ्या काळजी
कोरोनाकाळात ज्याप्रमाणे मास्कचा वापर करण्यात आला, तसेच स्वाईन फ्लूू टाळण्यासाठी गर्दीच्या व सर्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे कधीही उचित ठरते, असे आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. संसर्ग पसरू नये, यासाठी खोकताना अथवा शिंकताना नाका- तोंडावर रुमाल ठेवावा. हात वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावे. सर्दी, खोकला अंगावर न काढता किंवा स्वयंम औषधोपचार न करता डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. संशय भासल्यास चाचणी करून घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.