खर्डी रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा

खर्डी रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा

खर्डी, ता. ११ (बातमीदार) : खर्डी ग्रामीण रुग्णालय पूर्वी ३० खाटांचे होते. त्यामुळे तपासणीसाठी येणाऱ्या व अपघातग्रस्त रुग्णांची गैरसोय होत असे. नव्याने बांधलेल्या रुग्णालयाच्या इमारतीची क्षमता १०० खाटांची आहे; परंतु तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने रुग्णांना उपचार देताना कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण येत होता. त्यामुळे रुग्णांना तत्काळ उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय ५० खाटांचे करावे, जेणेकरून रुग्णांवर तत्काळ उपचार मिळतील, यासाठी स्थानिक शिष्टमंडळाने आरोग्य विभागाकडे वारंवार मागणी केली होती. या मागणीची दखल घेत १० जुलैला सरकारने खर्डी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला आहे, तसेच खाटांची संख्या ५० इतकी वाढवली आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, यासाठी सकाळमध्ये वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. आता उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

खर्डी ग्रामीण रुग्णालय हे खर्डी रेल्वे स्थानक व मुंबई-आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग यांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथे अपघातग्रस्त व परिसरातील रुग्णांना तत्काळ अत्याधुनिक उपचार मिळावेत, हा उद्देश ठेवून २०० खाटा बसतील, अशी रुग्णालयाची नवीन इमारत बांधली आहे. खर्डी ग्रामीण रुग्णालयासाठी ३० खाटांची मंजुरी व २५ कर्मचारी मंजूर आहेत; मात्र सध्या येथे १५ कर्मचारीच उपलब्ध आहेत, तसेच रोज उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांची संख्या २५० च्या आसपास आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे. नवीन इमारतीत कमीत कमी ५० खाटांचे रुग्णालय सुरू करावे, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी खर्डीतील शिष्टमंडळाने आरोग्य विभागाकडे वारंवार केली होती.

खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीत सध्या ३० खाटा उपलब्ध आहेत. रुग्णवाहिका दोन, १०८ रुग्णवाहिका एक आहे. सोनोग्राफी मशीन-१, एक्सरे मशीन-१, सीआर एक्सरे मशीन-१, ऑक्सिजन कंसंट्रेटर-२०, ईसीजी मशीन-२, फुल्ली ऑटो अनालायझर -१, फोटोथेरपी युनिट-४ व आयसीयू बेड-१० अशी अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत, परंतु कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने येथील अत्याधुनिक साहित्य अडगळीत पडले आहे. आता उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याने येथील कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल, तसेच येथे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करण्याची गरज आहे, तरच गोरगरीब जनतेला उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधा लाभ घेता येईल.

खर्डी उपजिल्हा रुग्णालय कागदावर न राहता त्यासाठी मंजूर असलेले तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची तत्काळ नेमणूक करावी, तसेच विभागातील गोरगरीब जनतेला चांगले उपचार मिळावेत.
-गणेश राऊत, शहापूर तालुका संपर्कप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

खर्डी परिसरातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता खर्डी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. येथील कर्मचाऱ्यांची लवकरच नेमणूक करण्यात येणार आहे. रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
-डॉ. कैलास पवार, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com