ऐन पावसाळ्यात कर्जतकरांचे पाण्यासाठी हाल

ऐन पावसाळ्यात कर्जतकरांचे पाण्यासाठी हाल

ऐन पावसाळ्यात कर्जतकरांचे पाण्यासाठी हाल

शहरातील गृहसंकुलात टँकरने पुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा.

नेरळ, ता. ११ (बातमीदार) ः कर्जतच्या शहरी भागात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई भेडसावत आहे. कधी तांत्रिक बिघाड, कधी विजेचे कारण देत प्रशासन वेळ मारून नेते असल्‍याने नागरिक हैराण झाले आहेत, तर अनेक गृहसंकुलांत आजही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने टँकरचा आधार घ्‍यावा लागत आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर पाणी समस्या निकाली निघेल, अशी नागरिकांचा अपेक्षा होती. मात्र अजूनही कोतवाल नगर, डेक्कन जिमखाना, आमराई, मुद्रे या भागात पाणी टंचाई कायम आहे. नाना मास्तर नगरमध्ये तर नेहमीच नागरिकांची पाण्यासाठी ओरड बघायला मिळते. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने सध्या कर्जत नगर परिषदेचा कारभार प्रशासनामार्फत सुरू आहे. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्‍याने प्रशासनाविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.
दोन दिवसांपासून नानामास्तर नगरमध्ये पाणीपुरवठ बंद आहे. त्‍यामुळे दैनंदिन काम करताना महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पाणीपट्टी वेळेवर भरून देखील पाणी मिळत नसेल तर ती का भरावी, असा प्रश्‍न येथील वृंदा पाटणकर या वृध्द महिलेकडून विचारण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना येथे तळमजल्यावर पाणी येते, परंतु दाब कमी असल्याने पहिल्या मजल्यावर पाणी चढत नसल्‍याची ओरड रहिवाशांची आहे. कर्जत बाजारपेठ आणि पोलिस मैदान परिसरातही नेहमीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्‍याचे नागरिक सांगतात.
कोतवालनगरमधील अनेक संकुलात भर पावसात टँकर आणावे लागत आहेत. यासाठी मध्यंतरी रहिवाशांनी कर्जत नगरपरिषदेत जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला तरीही परिस्‍थिती सुधारली नाही. तीन-चार दिवसांपासून कर्जतमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. नदी, नाल्‍यांची पातळी वाढली आहे. एकीकडे ग्रामीण भागात शासनाने पाणी पुरवठा करणारे टँकर बंद केले आहेत. तर दुसरीकडे कर्जतसारख्या शहरात पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. काही सोसायटीमध्ये नियमित टँकर मागवावा लागत असल्‍याने खर्च वाढत असल्‍याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कर्जत शहरासाठी २००७ मध्ये १४ कोटी ३२ लाख रुपये खर्चून सरकारने पाणी योजना आणली तर तालुक्यातील पेज नदीवरून पाणी उचलून ते शहरात आणले जाते. मात्र ही योजना आता जुनी-जीर्ण झाल्‍याने जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्‍यामुळे पाणी वाया जात असल्‍याची नागरिकांची तक्रार आहे.

शहरात सद्यःस्थितीत सहा हजार ८०० नळजोडणी देण्यात आल्‍या आहेत. घरगुती वापरासाठी १, ५०० रुपये, सोसायटीला ६,००० तर व्यावसायिक वापरासाठी ८,००० रुपये पाणीपट्टी कर्जत नगरपरिषद आकारते. वर्षाला पाणीपट्टी पोटी दोन कोटींच्या घरात वसुली केली जाते. मात्र पावसाळा सुरू झाला तरी शहरातील पाणीबाणी संपलेली नाही.

२४ जूनपासून संकुलात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. कर्जत नगरपरिषदेकडून येणारी पाणीपट्टी आम्‍ही नियमित भरतो, असे असताना पाणी न येण्याचे कारण काय आहे, बिघाड शोधायला इतका वेळ का लागतो? अधिकारी नक्की काय काम करतात? असे प्रश्‍न कायम आहेत.
- वृंदा सुहास पाटणकर, रहिवासी, नाना मास्तर नगर, कर्जत

कर्जत शहर सध्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. कचरा, वीज, पाणी समस्‍येबरोबरच अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव, भटक्‍या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. नगर परिषदेवर प्रशासक राज असून नागरिकांच्या समस्‍यांकडून दुर्लक्ष होत आहे.
- राकेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ता.

ऐन पावसाळ्यात कर्जत शहरांमध्ये अनेक सोसायट्‌यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ही खेदाची बाब आहे. मुख्याधिकारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन संपूर्ण शहराला मुबलक पाणी मिळेल, याचे नियोजन करावे. तसेच नियमित पाणीपुरवठ्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात.
- राजेश लाड, माजी नगराध्यक्ष, कर्जत नगरपरिषद

पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी आल्यास, त्‍यांचे निराकरण करण्याचा
प्रयत्‍न असतो. कर्जत शहराच्या काही भागांत पाण्याची समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. जलवाहिनी जीर्ण झाल्याने गळतीचे प्रमाण वाढले आहे. नवीन पाणी योजनेची निविदा प्रक्रिया सुरू आहे.
- अभिमन्यू येळवंडे, अभियंता, पाणी विभाग, कर्जत नगरपरिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com