मुंबई-नाशिक महामार्गाचा पंचनामा

मुंबई-नाशिक महामार्गाचा पंचनामा

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे सध्या वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पाहणी केली. यावेळी खारेगाव टोलनाका ते कसारापर्यंत होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच्या सूचनाही त्यांनी केल्या.
मुंबईहून नाशिक, शिर्डीकडे जाण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्ग महत्त्वाचा मार्ग म्हणून पहिले जाते. याच महामार्गाला समृद्धी महामार्गदेखील जोडला जात आहे. त्यामुळे सध्या या मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. अशातच पावसाळा सुरू असल्याने ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे खारेगाव टोलनाक्यापासून कसारापर्यंत वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी गुरुवारी पाहणी दौरा करण्यात आला. यावेळी महामार्गावर काही ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकण्यात आले आहे, तर काही ठिकाणी डांबरी रस्ते आहेत. त्यातही डांबरी आणि सिमेंट रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येत आहेत, त्या ठिकाणी खड्डे असल्याचे या पाहणीत दिसून आले, तर दुसरीकडे ज्या ज्या ठिकाणी डांबरी रस्ते आहेत, त्या ठिकाणीदेखील खड्डे पडल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे या महामार्गावरील खड्डे तत्काळ बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिले. यावेळी पावसाने उघडीप दिल्याने खड्डे बुजवण्याचा वेग वाढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
--------------------------------------
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष भोवले
मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाक्यापासून ते थेट कसारापर्यंत रस्त्यांवर खड्डेच खड्डे असल्याचे चित्र आहे. महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले होते, पण त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.