गायमुख चौपाटीच्या दुसऱ्या टप्प्याचे रविवारी लोकार्पण

गायमुख चौपाटीच्या दुसऱ्या टप्प्याचे रविवारी लोकार्पण
Published on

गायमुख चौपाटीच्या दुसऱ्या टप्प्याचे रविवारी लोकार्पण
आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : केंद्र आणि राज्य सरकार, ठाणे महापालिका, ठाणे स्मार्ट सिटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने नागला बंदर खाडीलगत विकसित करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौपाटी, गायमुखच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या रविवारी (ता. १) करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची शुक्रवारी (ता. ३०) आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली.

गायमुख येथे स्मार्ट सिटीच्या कामांच्या अंतर्गत येथे सुमारे ८०० मीटरची लांबी असलेल्या या चौपाटीवर जेट्टी, गणेश विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट, खाडीलगत पादचाऱ्यांसाठी पदपथ, रस्त्यालगत पदपथ, मियावाकी उद्यान, आसनव्यवस्था, अम्फी थिएटर, वाहन पार्किंग व्यवस्था, प्रसाधनगृहे, विद्युतरोषणाई आणि सीसीटीव्ही आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. दशक्रिया विधी घाट येथे सध्या बांधण्यात आलेली शेड अपुरी आहे. ती मोठी असावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी असल्याचे यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्यानुसार, वाढीव शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. नागला बंदर नाक्यानजीक होत असलेल्या सर्वधर्मीय स्मशानभूमीच्या जागेची तसेच, कासार वडवली येथील विविध समाज भवनांच्या इमारतीची पाहणीही आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त दिनेश तायडे आणि मनोहर बोडके आदी अधिकारी उपस्थित होते.

ठाणेकरांना फिरण्यासाठी, कौटुंबिक सहलीसाठी एक चांगली व्यवस्था तयार झाली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील ही सगळ्यात मोठी चौपाटी ठरणार आहे. त्यानुसार, या चौपाटीचा विकास करण्यात येत आहे. नागला बंदर येथेच आरमाराची प्रतिकृती साकारण्यात येणार असून हा नागला बंदर वॉटरफ्रंट डेव्हल्पमेंटचा तिसरा टप्पा असेल.
- सौरभ राव, आयुक्त, ठाणे पालिका


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वधर्मीय स्मशानभूमीच्या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत. हे सर्वधर्मीयांचे स्मृती वन असेल. त्यात काही कारणाने विलंब झाला असला, तरी आता हे काम मार्गी लागेल.
- प्रताप सरनाईक, आमदार

--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com