

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : बदलापूर प्रकरणानंतर राज्यात वाढत्या महिला अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, एनसीआरबीची आकडेवारी बघता महाराष्ट्रात सरकार बदलले, तरी महिला अत्याचाराच्या घटना कायम असल्याचे चित्र आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) च्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काळातील दैनंदिन सरासरी घटनांची संख्या १२६ असल्याचे समोर येत आहे.
कोविड लॉकडाऊन काळात दरदिवशी १०९ सरासरी महिला अत्याचाराच्या घटना घडत होत्या. विशेष म्हणजे, जानेवारी ते जून २०२२ या काळात ज्या सरासरी १२६ घटना प्रतिदिवशी घडत होत्या. आजही राज्यात महिलाविरोधी अत्याचाराच्या घटनांची सरासरी प्रतिदिवस १२६ एवढीच कायम आहे. बदलापूरची घटनेनंतर महिलाविरोधी अत्याचाराचा प्रश्न समोर आला आहे. शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये उद्रेक झाला. सत्ताधारी आणि विरोधकांनी महिला अत्याचाराच्या प्रमाणावरून एकमेकांविरोधात आरोप, प्रत्यारोपांची राळ उठवून दिली. मात्र, एनसीआरबीने केलेल्या विश्लेषणात २०२० या लॉकडाऊनच्या वर्षांत महाराष्ट्रात ३१,७०१ महिलांवर अत्याचार झाले. त्याची सरासरी ८८ घटना प्रतिदिवशी इतकी होती. २०२१ मध्ये राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांची संख्या अचानक उसळून ३९,२६६ वर पोहोचली. याची सरासरी १०९ घटना प्रतिदिवस एवढी होते. जानेवारी ते जून २०२२ या काळात महाविकास आघाडी सरकार असताना एकूण २२ हजार ८४३ घटना महिला अत्याचाराच्या घडल्या. त्याची सरासरी १२६ घटना प्रतिदिवस इतकी आहे.
----------------------------------------------
३० जून २०२२ रोजी महायुतीचे सरकार आले. जुलै ते डिसेंबर २०२२ या ६ महिन्यांत महिला अत्याचाराच्या २०,८३० घटना घडल्या. याची सरासरी केल्यास ११६ घटना प्रतिदिवस इतकी येते. आता २०२३ मध्ये २०२२ इतक्याच घटनांची नोंद झाली आहे. त्याची सरासरीसुद्धा १२६ घटना प्रतिदिवस एवढी होते. याचाच महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना महिला अत्याचाराच्या घटनांची जी सरासरी होती, ती कायम आहे.
---------------------------------
पाॅक्सोचे गुन्हे वाढले
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रयत्न (पॉक्सो) या श्रेणीतील गुन्हे पाहिले, तर त्यात २०२१ पासून अचानक मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. दररोज शंभरपेक्षा कमी गुन्हे घडत होते; मात्र २०२१ नंतर त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. एकीकडे हा कल दिसत असताना १८ वर्षांपेक्षा वरील मुलींच्या बाबतीत विनयभंगाच्या गुन्ह्यांची संख्या ही कमी झालेली दिसून येते. २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात १,३१७ गुन्हे नोंदले होते, ते २०२३ मध्ये १२०८ इतके नोंदले गेले.
‘पॉक्सो’अंतर्गत दाखल गुन्हे
वर्ष संख्या
२०१७ - ९४
२०१८ - ४८
२०१९ - ९४
२०२० - ४८
२०२१ - २४९
२०२२ - ३३२
---------
मुंबईतील गुन्हे कमी झाले
मुंबईत पॉक्सोच्या अंतर्गत कलम ४ आणि ६ अंतर्गत बलात्काराचे नोंदले गेलेले गुन्हे कमी झालेले आहेत. लॉकडाऊनच्या काळात मुंबईत २०२० मध्ये ४४५ बलात्कार झाले. २०२१ या लॉकडाऊन काळात ५२४ बलात्कार अल्पवयीन मुलींवर झाले. २०२२ मध्ये ही संख्या ६१५ वर गेली, तर २०३० मध्ये ती कमी होऊन ५९० वर खाली आली आहे.
--------------------------------------------
वर्ष - महिला अत्याचाराच्या घटना - सरासरी/प्रतिदिन
२०२० - ३१७१० (कोविड काळ) - ८८ घटना
२०२१ - ३९२६६ (कोविड काळ) - १०९ घटना
जानेवारी ते जून २०२२ - २२८४३ - १२६ घटना
जुलै ते डिसेंबर २०२२ - २०८३० - ११६ घटना
२०२३ - ४५४३४ - १२६ घटना
----------
सरकार कुठलेही असो, मात्र त्यांचा मुख्य अजेंडा सत्ताकारण हाच असतो. सामाजिक अस्वस्थता किंवा समाजाच्या स्वास्थ्याकडे त्यांचा फोकस नसतो. त्यामुळे सरकार बदलते. मात्र, कुणीही महिला सुरक्षेकडे गांभीर्याने बघताना दिसत नाही. त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना कमी होत नाही.
- धनराज वंजारी, निवृत्त पोलिस अधिकारी
...
निर्भयानंतर कायदे कठोर बनले. परंतु, त्यांची अंबलबजावणी करणारे मेकॅनिझम नाही. कोणतेही सरकार आले, तरी महिलांच्या दृष्टीने जोपर्यंत पोषक वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही.
- वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.