

नारीशक्तीच विकसित भारताचा मोठा आधार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राज्यातील महिला अधिकाऱ्यांचा गौरव
बोईसर (बातमीदार) : महिला विकास व नारी सशक्तीकरणात महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे सांगून राज्यातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिला अधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पालघरमध्ये केला. ही नारीशक्तीच विकसित भारताचा मोठा आधार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी वाढवण बंदराच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले की, ‘‘महाराष्ट्रातील अनेक उच्च पदांवर महिला अधिकारी अतिशय सक्षमपणे काम करत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य सचिवपदी असलेल्या सुजाता सौनिक या राज्यातील प्रशासनाला मार्गदर्शन करत आहेत. पहिल्यांदाच राज्याच्या पोलिस महासंचालकपदी असलेल्या रश्मी शुक्ला या नेतृत्व करत आहेत. पहिल्यांदाच राज्याच्या वन संरक्षण बलाच्या प्रमुखपदी असलेल्या सौमिता बिश्वास नेतृत्व करत आहेत. राज्याच्या विधी विभागाच्या प्रमुख म्हणून सुवर्णा केवले या जबाबदारी सांभाळत आहेत. राज्याच्या प्रधान अकाऊंटंट जनरलपदी जया भगत यांनी, तर मुंबईतील कस्टम विभागाची धुरा प्राची स्वरूप सांभाळत आहेत, तर मेट्रो तीनचे नेतृत्व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रातही महिला नेतृत्व करत असल्याचे सांगून महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानेटकर आणि पहिल्या कौशल्य विकास विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. अशा अनेक महत्त्वाच्या मोठ्या जबाबदारीच्या पदांवर महाराष्ट्रातील नारीशक्ती उत्कृष्ट कार्य करत आहे. विसाव्या शतकातील नारीशक्ती समाजाला नवी दिशा देण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.