कामगारांच्या जिवाशी खेळ

कामगारांच्या जिवाशी खेळ
Published on

रोहा, ता. १५ (बातमीदार)ः धाटाव एमआयडीसीमधील साधना नायट्रोकेम कंपनीत केमिकल टँकच्या झालेल्या भीषण स्फोटात सहा कामगार होरपळले होते. त्यातील दोघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला होता. तीन गंभीर असलेल्या कामगारांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या बारा तासांनंतर कंपनी व्यवस्थापनाने कामगारांचा जीव धोक्यात घालत काही काळासाठी पुन्हा उत्पादनप्रक्रिया सुरू केल्याने सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे.
धाटाव एमआयडीसीतील साधना नायट्रोकेम कंपनीत गुरुवारी (ता. १२) झालेल्या भीषण स्फोटात दोघा परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाला होता. तर त्याच दिवशी सायंकाळी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तिसऱ्या कामगाराची प्राणज्योत मालवली होती. या घटनेने रोहा एमआयडीसीतील कंपन्यांमधील कामाच्या असुरक्षित पद्धती तसेच अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेवरून असंतोष पसरला आहे. अशातच घटनेच्या बारा तासांतच व्यवस्थापनाने पुन्हा केमिकलचे उत्पादन सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्याच ठिकाणी तब्बल पाच तास काही कामगार काम करत असल्याने कंपनीचा मालक तसेच व्यवस्थापकांवर कारवाईची मागणी होत आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधण्यात आला; पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
-------------------------------------------------------------
चौथ्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
धाटाव एमआयडीसीतील स्फोटात दोघांचा घटनास्थळावरच तर एका कामगाराचा नवी मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेतील अनिल मिश्रा या गंभीर जखमी झालेल्या चौथ्या कामगाराचा रविवारी सकाळी ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकाराने कामगार वर्गातून एकीकडे हळहळ व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे कंपनी व्यवस्थापन मात्र उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करण्यात मश्गूल आहे.
----------------------------------------------------------
फोन करणारी व्यक्ती कोण?
दुर्घटनेच्या बारा तासांनंतर कंपनीबाहेरील काही कामगारांना बोलावून रात्री सीएफ २ प्लॅंटमधून केमिकलचे उत्पादन घेण्यात आले होते; पण दुसऱ्या दिवशी सकाळी कोणाचा तरी फोन आल्याने पुन्हा कंपनीतील उत्पादनप्रक्रिया बंद करण्यात आली होती. त्यामुळे फोन करणारी ती व्यक्ती कोण, याची चर्चा सुरू आहे. कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याने धाटाव एमआयडीसीत संतापाचे वातावरण पसरले आहे.
--------------------------------------------------------
ठाकरे गट आक्रमक
कंपनीतील चार कामगारांचा जीव जाऊनही उत्पादनप्रक्रिया सुरू करणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप कंपनीचा मालक तसेच व्यवस्थापकावर गुन्हा दाखल नाही, त्यामुळे दोषींवर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केली आहे. तसेच, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com