

मनोर, ता. ३० (बातमीदार) : शिक्षकांना मानधनासाठी निधी नसल्याच्या कारणाने वसई तालुक्यातील भारोळ आणि पेल्हार जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता नववी, दहावीचे वर्ग बंद केल्याच्या प्रकारावर चौफेर टीका सुरू होती. आता जिल्हा परिषदेने भारोळ शाळेतील वर्ग पुन्हा सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. परंतु पेल्हार शाळेतील वर्गांबाबत निर्णय झालेला नाही. लवकरच पेल्हार शाळेच्या वर्गांबाबतीत आदेश काढले जातील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे यांनी दिली. वर्ग सुरू होणार असल्यामुळे भारोळ गावातील विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची चांदीपच्या शाळेत जाण्यासाठी १५ किमीची पायपीट थांबणार आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने भारोळ आणि पेल्हार शाळेतील नववी आणि दहावीचे वर्ग बंद करून १४२ विद्यार्थ्यांचे समायोजन १५ किमी अंतरावरील शाळांमध्ये केले होते. विद्यार्थ्यांची रवानगी चांदीप आणि खानिवडे येथील शाळांमध्ये करण्यात आली होती. दरम्यान वर्ग बंद करण्याचा निर्णय घेताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि शिक्षण सभापतींना अंधारात ठेवल्याचे समोर आले होते. वर्ग बंद करून विद्यार्थ्यांचे समायोजन केल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मिळाला नसल्याची माहिती पुढे आली होती. दरम्यान वर्ग बंद केल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी शिक्षण विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते.
शिक्षकांची पदे मंजूर झालेली नसल्यामुळे नेमणूक केलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून मानधन दिले जाते. मानधनासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडे निधीची मागणी करूनही निधी उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्हा परिषदेमार्फत माध्यमिक शाळा सुरू ठेवण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे.
एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना विद्यार्थ्यांना महामार्गांवरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. शिक्षकांच्या पगारासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ही लाजिरवाणी बाब आहे. भारोळ शाळेतील वर्ग पुन्हा सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने काढल्याबद्दल समाधान आहे. पेल्हार शाळेतीलही वर्ग सुरू झाले पाहिजेत.
- गणेश भुरकूड, अध्यक्ष, आदिवासी विकास समिती
वर्ग बंद करण्याचा निर्णय रद्द करून वर्ग पुन्हा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले होते. वर्ग सुरू ठेवण्यासाठी तजवीज केली जाईल.
- प्रकाश निकम, अध्यक्ष, पालघर जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.