

कासा, ता. ३० (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्ग, तसेच चारोटी-कासा राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदारी सुरू आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर मोकाट जनावरे बसलेली असल्याने रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या दरम्यान अनेक गुरांचे अपघात घडत आहेत.
चारोटी-कासा राज्य मार्गावर सिटी बिल्डिंगसमोर सोमवारी (ता. ३०) पहाटे भरधाव ट्रकने एका वासराला धडक देत गंभीर जखमी केले. ते वासरू खाली पडले असतानाही ट्रकचालक त्यावरून जायच्या तयारीत होता, मात्र आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून चालकाला ट्रक मागे घेण्यास सांगितले आणि वासरू सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर जखमी वासरास पशुवैद्यकीय डॉक्टरांनी उपचार दिले. त्या वेळी वासराच्या आईने मोठ्या आवाजात ओरडण्यास सुरुवात केली.
सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक वाहने नाशिक राज्य मार्गावरून ये-जा करीत आहेत. पावसाळ्यात मोकाट गुरे रस्त्यात बसलेली असल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. महामार्गावर वारंवार गुरांचे अपघात होत असल्याने जखमी प्राण्यांसाठी जवळपास गोशाळा किंवा उपचार करणारे वैद्यकीय केंद्र असणे आवश्यक आहे. यासाठी सरकार अथवा सामाजिक संस्थांनी लक्ष दिले पाहिजे.
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि जखमी प्राण्यांचे त्वरित उपचार करण्यासाठी शासकीय आणि सामाजिक पातळीवर अद्ययावत गोशाळा आणि वैद्यकीय सुविधा उभारण्याची आवश्यकता आहे.
गोरक्षकांचे आवाहन
चारोटी-कासा, तसेच महामार्गावरील जखमी वासरं आणि गाई आणण्यासाठी आमच्या गोशाळेतून रुग्णवाहिका पाठवण्यात येते. त्यांना वाडा येथील गोशाळेत आणून तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी केली जाते. येथे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर असल्याने बऱ्याच प्राण्यांना जीवदान देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे सुरभी गोशाळाचालक किशोर कराळे यांनी सांगितले.
स्थानिकांकडून मदतीचा प्रयत्न
चारोटी-कासा राज्य मार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने गेल्या अनेक दिवसांत रस्त्यावर बसलेल्या गुरांचे आणि वासरांचे अपघात होत आहेत. आम्ही घटनेची माहिती कळल्यावर तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो, असे गोरक्षक नारायण जाधव यांनी सांगितले.
गेल्या आठ दिवसांत चारोटी-कासा मार्गावर १२ गाय व वासरांचे अपघात झाले आहेत. त्यांना उपचारासाठी गोशाळेत पाठवण्यात आले आहे. महामार्गावर गेल्या दोन महिन्यांत सुमारे अडीचशे गायगुरांचे अपघात झाले असून त्यात कित्येकांचे मृत्यू झाले आहेत.
- बाबू सिंग, गोरक्षक, चारोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.