

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : भारतात जी क्रांती झाली तिच्या सामाजिक आणि धर्मचिकित्सेचा पाया हा महात्मा फुले यांनी रोवला होता. त्यांच्या या धर्मचिकित्सेच्या पायावरच भारतीय राज्यघटना तयार झाली. जर ती फुलेंच्या धर्मचिकित्सेच्या पायावर तयार झाली नसतील तर आज भारतीय राज्यघटना इतकी टिकली नसती, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी आज मुंबईत केले.
पुण्यातील डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या व महेंद्र भवरे आदींनी संपादन केलेल्या फुले-आंबेडकरी वाङ्मय कोशाचे आज मुंबईतील प्रेस क्लब येथे डॉ. कसबे यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव व ज्येष्ठ कवयित्री मीनाक्षी पाटील या प्रमुख वक्त्या, तसेच डॉ. सुनील अवचार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कसबे पुढे म्हणाले की, जगाचा इतिहास सांगतो, सामाजिक आणि धार्मिक क्रांती झाल्यानंतर राजकीय क्रांती होते. भारतात जी क्रांती झाली तिचा पाया महात्मा फुले यांनी केलेल्या सामाजिक आणि धार्मिक चिकित्सेत होता. त्यांनी भारताच्या सामाजिक आणि धर्मचिकित्सेचा पाया रोवला होता. महात्मा फुले हे आधुनिक भारताचे ते खऱ्या अर्थाने निर्माते होते, असेही डॉ. कसबे म्हणाले. फुले-आंबेडकरी वाङ्मय कोश हा महात्मा फुले यांनी निर्माण केलेली धर्मचिकित्सा आणि बाबासाहेब यांची समाजवाद यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पेशवाईतील अनेक हिंदुत्वाचे उदाहरण देत डॉ. कसबे म्हणाले, नाना फडणीस यांच्या गोवऱ्या मसनात गेल्या होत्या, त्यावेळी त्याची शेवटची सातवी बायको १३ वर्षांची होती, हे यांचे हिंदुत्व होते. तेच हिंदुत्व आमच्यावर लादले जात असेल तर ते आमचे अनुयायी कधीही होऊ देणार नाहीत.
ज्येष्ठ कवयित्री व साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी या वाङ्मय कोशातील अनेक बारकावे मांडले. जे दलित साहित्याचे प्रवाह राहिलेले होते, त्याच्या नोंदी यातून आल्या असून त्यात वस्तुनिष्ठता दिसून येते. हे या कोशाचे बलस्थान असल्याचे त्या म्हणाल्या. अनेक संशोधक, विचारवंतांना दिशा देणारा, संशोधनासाठी चालना देणारा हा कोश बुद्धांच्या मेत्ता भावनेला बळ देणारा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी या वाङ्मय कोशाचे संपादक महेंद्र भवरे यांनी माहिती दिली.
------
हा कोश सामाजिक दस्तावेज!
ज्येष्ठ साहित्यिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन डांगळे यांनी पुढची आणि मागची पिढी यातील दुवा साधून त्या पिढीला सामाजिक, साहित्यिक दस्तावेज देणे आवश्यक असते. या दृष्टीने हा कोश हा सामाजिक दस्तावेज असून तो पुढील पिढीला खूप महत्त्वाचा ठरणार असल्याचे ते म्हणाले. पुढच्या पिढीला निर्माण करून दिल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.