

मोदींच्या सभेसाठी तीन सभामंडप
लाडक्या बहिणींसह महिला बचत गटांना निमंत्रण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाण्यातील बोरीवडे येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यानुसार या कार्यक्रमात कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या वेळी सभेसाठी तीन सभामंडप उभारले आहेत, तसेच एलइडी स्क्रीनची सुविधादेखील या वेळी उपलब्ध करून दिली आहे, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लाडक्या बहिणींसह महिला बचत गटाच्या महिलांना ठाणे पालिका व जिल्हा प्रशासनाकडून फोन करून निमंत्रण देण्यात येत आहे.
ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली येथील बोरीवडे येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी येत आहेत. या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती केली आहे. त्यानुसार या ठिकाणी १०० बेडचे तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालय उभारले जात आहे. त्यात ठाणे पालिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत ठाणे परिवहन सेवेच्या ३२० बस नागरिकांना आणण्यासाठी दिमतीला ठेवल्या जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. याशिवाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टॉयलेट आदींसह पार्किंगची व्यवस्था उभारण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठाण्यात विविध कामांचे भूमिपूजन, लोकार्पण, तसेच लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. याअंतर्गत ठाण्यातील प्रस्तावित असलेला अंतर्गत मेट्रो, नवीन महापालिका मुख्यालय, नैना पायाभूत सुविधा प्रकल्प आदींसह इतर कार्यक्रमांचे भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुपारी चार वाजता पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यानुसार कार्यक्रमस्थळी जिल्हा प्रशासन, महापालिका आदींसह इतर प्राधिकरण दिवसरात्र सुरू असलेल्या कामांवर देखरेख ठेवत आहेत. सध्या येथील तीन सभामंडपांचे काम जोमाने सुरू असून मध्यभागी मोदी हजर राहणार आहेत, तर बाजूला असलेल्या दोन मंडपांच्या ठिकाणी एलइडीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, तसेच भरउन्हातच हा कार्यक्रम होणार असला तरीदेखील उपस्थित राहणाऱ्या महिलांसह नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागू नयेत, या दृष्टीने बंदिस्त मंडप उभारला जात आहे, तसेच जमिनीवर चिखल साचल्याने त्यावर रोलींगचे कामही सुरू आहे. याशिवाय बॉम्ब शोधपथकदेखील येथे असेल.
महिलांसाठी फूड पॅकेट, पाणी व एनर्जी ड्रिंक
एक किमीच्या परिघातच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार या ठिकाणी बससाठी सात आणि कार व दुचाकीसाठी पाच पार्किंगची व्यवस्था केली आहे, तसेच रस्त्याच्या पलीकडील बाजूस असलेल्या टिएमटीच्या बस डेपोत, तसेच येथील एका खासगी शाळेत, त्याच्या बाजूला असलेल्या मैदानातदेखील पार्किंगसाठी व्यवस्था करण्याची तयारी सुरू झाली आहे. बसमधून येणाऱ्या महिलांसाठी आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यासाठी प्रत्येक बसमध्ये नर्स, वॉर्डबॉय, बस कॉर्डीनेटर व इतर असे पाच जणांचे पथक सज्ज असणार आहे, तसेच बसमधून उतरताना महिलांच्या हाती फूड पॅकेट, पाणी व एनर्जी ड्रिंक दिले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.