भिवंडी पश्चिममध्ये अटीतटीचा सामना
भिवंडी पश्चिममध्ये अटीतटीचा सामना
पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. ३० (बातमीदार) : शहरातील मूळ लोकवस्तीचा भाग असलेले क्षेत्र म्हणजे भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्र होय. विधानसभा निवडणुकीसाठी भिवंडी पश्चिममध्ये डझनभरापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अटीतटीचा सामना रंगणार आहे. विद्यमान भाजप आमदार महेश चौघुले या निवडणुकीत जिंकल्यास त्यांची हॅट्ट्रिक होणार आहे. त्यांनी मागील दहा वर्षांच्या काळात मतदारसंघातील मुस्लिम समाजाची कामे करून त्यांचा विश्वास संपादन केला आहे; मात्र यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी वाढले आहेत.
माजी महापौर विलास पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मागितली होती; मात्र काँग्रेसने निष्ठावंत व क्रियाशील पदाधिकारी दयानंद चोरघे यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. महाविकास आघाडीने उमेदवारी दिली असतानादेखील या ठिकाणी समाजवादी पक्षाचे रियाज आझमी यांनीदेखील आपला अर्ज दाखल केला आहे. तर, मागील निवडणुकीत भाजप उमेदवार महेश चौघुले यांच्यापुढे आव्हान ठरलेले एमआयएमचे उमेदवार मो. खालिद (गुड्डू) मुख्तार अहमद शेख यांनी यावेळी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे. तर, एमआयएमचे उमेदवार म्हणून मुंबईतील माजी आमदार वारीस पठाण यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.
२०१९च्या भिवंडी पूर्व विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार मनोज गुळवी यांना १,४९२ मते मिळाली होती. त्याच गावात राहणारे शिवसेना उमेदवार रुपेश म्हात्रे यांना जिंकण्यासाठी १,३१५ मतांची आवश्यकता होती. या ठिकाणी समाजवादीचे रईस शेख निवडून आले. त्यामुळे मनसेने शिवसेना उमेदवाराचा पराभव केल्याचा प्रचार झाला होता. आता मनसेने मनोज गुळवी यांना भिवंडी पश्चिममध्ये उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ते कोणाची मते घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, मुख्य राजकीय पक्षासह इतरही अपक्ष आणि राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, त्यामुळे भिवंडी पश्चिमची निवडणूक चुरशीची होणार आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक फूटपट्टी घेत शहराचा अथवा आपल्या मतदारसंघाचा विकास मोजू लागतात; मात्र समस्या सोडविण्याच्या दृष्टीने केलेल्या कामाची पावती कोणीही देण्यास तयार नसतो. तर, निवडून आल्यावर आपल्या सर्व समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन देतात; मात्र निवडून आल्यानंतर पाच वर्षे कोठे निघून जातात, याचा हिशेब मतदारदेखील लावत नसल्याने गेल्या वीस वर्षांपासून असलेल्या समस्या वाढत आहे.
तक्रारीनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष
भिवंडी पश्चिम मतदारसंघात राहणारे लोक येथील मूळचे स्थानिक आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनी जुनी भिवंडी नगर परिषद ते भिवंडी महापालिकेची जडणघडण होताना पाहिली आहे. येथील लोकप्रतिनिधींनी मोठमोठी भाषणे देत येथील नागरिकांना केवळ स्वप्ने दाखविली; मात्र प्रत्यक्षात भिवंडीकरांना समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. येथील जवळजवळ सर्वच शासकीय कार्यालयाविरोधात सत्ताधारी आणि विरोधक मोर्चा काढत आहेत. तर, अनेकदा सरकारकडे तक्रारी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनावर सत्ताधारी आणि विरोधकांचा अंकुश राहिलेला नाही, हे तितकेच खरे आहे. याचे परिणाम येथील सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत.
अनधिकृत बांधकामे
भिवंडी शहर आणि तालुक्याचा मध्यवर्ती भाग म्हणून भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. असे असताना या भागात मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. पालिकेने बांधलेल्या रस्त्यांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सिमेंटच्या रस्त्यालगतचे पेव्हरब्लाॅक उघडल्याने तसेच उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने झालेल्या अपघातात अनेकांचा नाहक बळी जात आहे.
अरुंद रस्त्यांची समस्या
मैदाने आणि बगिचाची दुर्दशा झाली आहे. तर, सांस्कृतिक केंद्र असलेले स्व. मीनाताई ठाकरे रंगायतन गेल्या काही वर्षांपासून दुरुस्त करता आले नाही. मेट्रो रेल्वेचे काम अर्धवट आहे. सरकारी आरोग्य सेवा कोलमडल्याने खासगी रुग्णालयात वाढ होत आहे. तर, या मतदारसंघात मागील ४० वर्षांत काही ठिकाणी तीन-चार वेळा रस्ता रुंदीकरण झाले, तर अनेक ठिकाणी एकदाही रस्ता रुंदीकरण झाले नाही, त्यामुळे अरुंद रस्त्यांची मोठी समस्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.