बेरोजगार, नाका कामगारांची दिवाळी
वाशी, ता. ३१ (वार्ताहर) : निवडणुकीचा काळ सुरू असून नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झालेली दिसते. ज्याच्या सभेला जास्त गर्दी त्याच नेत्याची दखल प्रसारमाध्यमांतून घेतली जाते. त्यामुळे सभेला गर्दी कशी जमवता येईल, यासाठी नेत्यांचे कार्यकर्ते नवनवीन युक्त्या लढवत असतात. यामुळे जो कार्यकर्ता जास्त गर्दी जमवून आणेल त्याला पक्षात विशेष महत्त्वदेखील दिले जाते. शिवाय, सभेला गर्दी जमल्यामुळे नेत्याची लोकप्रियता आणि समाजातील प्रतिमा वाढण्यास मदत होते. त्यामुळे रॅली आणि सभांसाठी जास्तीत जास्त गर्दी जमवण्याचा प्रयत्न सर्वच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून केला जातो. या गर्दी जमवण्याच्या कामात सध्या बेरोजगार युवक आणि नाका कामगारांना सुगीचे दिवस आले असून त्यांची दिवाळी उत्साही होणार आहे.
यंदा विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईतून सर्वच पक्षातून मातब्बर नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक प्रचंड चुरशीची बनलेली असून जनतेचा ओघ आपल्याकडे कसा वळवता येईल, याकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर रोजी संपली असून आता उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक अपक्ष आणि बंडखोरी केलेले उमेदवारदेखील सामील आहेत. या सर्वांच्याच रॅली आणि सभांना प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह हे नवी मुंबईतील राजकीय सभांचे केंद्रस्थान बनले असून सभांना गर्दी जमवण्यासाठी वाशी, सानपाडा, तुर्भे, कोपरखैरणे आणि घणसोली भागातील बेरोजगार युवक आणि नाका कामगारांना पक्ष आणि कार्यकर्त्यांकडून बोलावले जात आहे. त्यामुळे स्वपक्षीय कार्यकर्त्यांची जरी गर्दी जास्त नसली तरी या जमवलेल्या गर्दीमुळे उमेदवार आणि नेत्यांच्या सभा प्रचंड गर्दीत होत असल्याचे चित्र प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपुढे जात आहे.
---------------
आर्थिक मदतीसह जेवणाची सोय
नेत्यांच्या प्रचाराच्या गर्दीमध्ये नुकतेच कॉलेज संपलेले किंवा शिक्षण अर्धवट सोडलेले, लहान मोठी नोकरी-व्यवसाय करणारे युवक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. काही अधिकचे पैसे कमवण्यासाठी हे युवक या राजकीय सभांना गर्दी म्हणून जात आहेत. एखाद्या उमेदवार किंवा नेत्यासाठी बाइक रॅली काढायची झाल्यास पक्षाकडून किंवा पदाधिकाऱ्यांकडून या युवकांना बाइकमध्ये पेट्रोल भरून दिले जाते. तसेच, चहा-नाश्ता, बिर्याणी इत्यादी गोष्टी पुरवून युवक रॅली आणि सभेला येण्याची हमी घेतली जाते.
---------------
नाका कामगारांना अच्छे दिन
नाका कामगारांचा सभा, प्रचारामध्ये मोठा सहभाग पाहायला मिळतो आहे. सकाळी आठ वाजल्यापासून वाशीतील सेक्टर नऊ, पाम बीच मॉलजवळील एमएसईबी कार्यालयाजवळ, तुर्भे नाका, जनता मार्केट, कोपरखैरणे सेक्टर १९ या ठिकाणी नाक्यांवर सुमारे एक ते दीड हजार नाका कामगार उभे असतात. सध्या हे नाका कामगार प्रचार आणि सभांमध्ये व्यस्त असल्याने लहान-मोठी कामे करण्यासाठी कामगार मिळत नसल्याचे काही कंत्राटदारांनी सांगितले. रॅली किंवा प्रचारात नाका कामगारांना ५०० ते एक हजार रुपये एका रॅली आणि सभेसाठी मिळत असल्याने नाका कामगार आपली रोजंदारी कमावण्यासाठी सध्या सर्वपक्षीय कार्यकर्ते म्हणून सभांना आणि रॅलींना गर्दी करत आहेत. या प्रचंड मोठ्या गर्दीचा फायदा उमेदवारांनादेखील होत असून प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने उमेदवार लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
------------------
दिवाळीच्या खर्चाला हातभार
पक्ष आणि उमेदवारांचा प्रचार सकाळी सुरू होत असून संपूर्ण दिवस प्रचारातच जातो. अशावेळी गर्दीत जमलेल्या युवक आणि नाका कामगारांसाठी सकाळचा नाश्ता, वडापाव किंवा समोसा-पाव, दुपारच्या जेवणात पुलाव किंवा बिर्याणी, संध्याकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचे जेवण अशी सर्व सोय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येते. त्यामुळे कोणताही खर्च होत नसल्याने हातात पैसे उरत असल्याचे नाका कामगार आणि बेरोजगार युवकांकडून सांगितले जात आहे. दिवाळीच्या दिवसांत हातात चार पैसे मिळत असल्याने यंदाची दिवाळी चांगली जात असल्याच्या भावना नाका कामगार आणि युवकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. यातून काही तरुणांनी दिवाळीनिमित्त नवीन कपडे, घरच्यांसाठी भेटवस्तूदेखील घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

